Wednesday, September 19, 2018

एक वेगळीच मधुराभक्ती!


हा व्हिडिओ  ब़घितला. प्रथम सगळ्या ट्रिटमेंटवरच फिदा. मग पुन्हा लगेच पाहिला. अन मग कितीदा तरी!
पहिल्यांदा बघितला तेव्हा फक्त सुरांकडे, तालाकडे, तौकिफ, गायिका अन नायिका यांच्याकडेच लक्ष गेलेलं. दुसऱ्यांदा बघितला तेव्हा अजून काय काय जाणवलं. सुंदर बोलणारं गिटार, भावना व्यक्त करणारं।
प्रियांकाचा भावना भरलेला आवाज, त्या भावनांना तौकिफजींच्या आवाजतालांनी दिलेली गहराई! सारंग यांच्या गिटारच्या सुरांनी दिलेली चपलता अन काव्यातल्या शब्दांनी व्यक्त होणं!
या सगळ्याचं दृष्य स्वरूप समोर उलगडत जातं।

सुरुवातीची नायिकेची, गायिकेची झलक, नुसतच साधं रूप, गायिकेच्या गाण्यातली उत्सुकता अन ताल अन तालशब्दातून एक अस्वस्थता, उत्सुकता कशाची तरी आस जाणवली.
हळुहळू आजुबाजुची असुंदर वास्तवाची जाणीव झाली। फोफडे उडलेल्या भिती, फरशी दिसली... अन मग नायिकेचे सौंदर्य उभरके पुढे येऊ लागलं... वास्तव ओझल झालं...सोबत सुरांचं अन तालांचं गारुड... अन मग नायिकेचं अधिर होत येणं पायऱ्यांवरून उलटं वळून फुलं पुन्हा घेऊन येणं अन गायिकेची वाढत गेलेली हाक. अन शेवटी ती फुलं देणं अन दोघींचं आलिंगन...

हे सगळं मनात साठवत खालचं डिस्क्रिप्शन वाचलं अन मनात झळकून गेलं... नक्की काय सांगायचं असावं?
क्षणभर मनात आलं शेवट समलैंगिक संबंध तर सूचवत नाहीये न? नायिकेचं सगळं सजणं, ती फुलं गायिकेसाठी?
पण छे, बंदिश तर शिवाला भेटण्याबद्दल बोलतेय. अन मग झटकन मनात आलं...कलेचं कलाकाराला भिडणं तर नव्हे हे? 

कलाकार अन त्याची कला त्यांच्यातला प्रवास, त्यांच्यातली ओढ हे तर सुचवायचं नाही? कलाकाराला कला सुचत जाते, उलगडत जाते अन मग साक्षात समोर उभी रहाते तो क्षण असाच आलिंगनाचा, तृप्ततेचा, समर्पणाचा असेल  :) ही ही एक वेगळीच मधुराभक्ती!

अन मग आता संध्याकाळच्या कातरवेळी अजून काय काय सुचलं. 

तिचं पायऱ्या उतरताना कठड्याला धरून ठेवलेला हात कलेच्या नियमांना दर्शवतोय? अन फुलं मूळ कल्पनेतली कला- सौंदर्य, निर्वाज्यता, शुध्दता, कोमलता सुचवतय? कलेला साकारताना अतिरेकी नियम लावताना मूळ कला तर सुटून नाही न गेली?

अन मग आता रात्री वाटलं, ही शिवा जिवाची तर भेट नसेल न दाखवायची? वास्तवातलं सगळं अगदी सगळं... जे नाही सुसह्य, अनेक अडचणी, कमतरता, त्रास, अपु-या गोष्टी, एकुणच जीवनातलं अपुरेपण.... पण ते सगळं क्षणात सुंदर होऊन जातं। एक उर्मी जागवतं, एक नवी उभारी देतं। कधी? तर जेव्हा एक ओढ लागते। प्रिय व्यक्तीची, कलेची किंवा त्या शिवाची। जे पूर्णत्वाचं रूप। 

ते भेटणं दोघांनाही परिपूर्ण करणारं! त्यासाठीची सगळी मेहनत, कष्ट, त्रास सगळं सगळं आनंदाचं, आनंदानं स्विकारण्याचं! हा सगळा प्रवासच एक कला होऊन जातो मग :)

निर्माणकर्त्याला काय दाखवायचं होतं कोणजाणे। पण माझ्या पर्यंत पोहोचलं ते हे! प्रत्येकाचं भावणं, दृष्टिकोन, समज, अनुभव,स्वभाव,... सगळं वेगळं। पण हेच तर कलेचं मोठेपण। प्रत्येकापर्यंत पोहोचतेच ती। कशाही रुपात। आणि देतेच आनंद अगदी सगळ्यांनाच, भरभरून!
-----

व्हिडिओचे तपशील
कंपोझिशन, काव्य : पं पद्माकर बर्वे
संगीत: सारंग कुलकर्णी
गायिका: प्रियांका बर्वे
सरोद: सारंग कुलकर्णी
आवाजी ताल अन तालवाद्य: तौफिक कुरेशी
नायिका : प्रियांका मिसाळ
दिग्दर्शन : आर्य रोठे
---

No comments:

Post a Comment