Tuesday, May 15, 2018

काय आणि कशासाठी

बिग बॉस मुळातच एक आचरट अतरंगी आणि बिभत्स खेळ आहे. आणि तरीही तितकाच अवघड खेळही आहे. व्यक्तीची मानसिकरित्या संपूर्ण घुसळण इथे होऊ शकचे, रादर केली जाते. मानसिकरित्या तुमचा प्रचंड कस तिथे लागू शकतो. अगदी वाईट शब्दात धज्जियाही उडू शकतात. तिथले टास्क, केले जाणारे गृप्स, पडणारे गृप्स या सगळ्यातून मानसिक खच्चिकरण सहजी होऊ शकतं.  त्याच व्यक्ती अन त्यांना न टाळता येऊ शकणं हे भयंकर इरिटेटिंग होऊ शकतं. शिवाय व्यक्तीच्या मनातल्या राक्षसी, हिंसक, भांडकुदळ, एकुणातच नकारात्मक भावना कशा वर येतील हे यात बघितलं जातं. केवळ खेळणारे नव्हे तर पाहणार्यांच्याही. एकदा बघायला सुरुवात केली की त्या जाळ्यात सामान्य व्यक्ती ओढली जाते. मानवी स्वभावातली नकारात्मकता यात उद्दिपित केली जाते. अन प्रबळ मानसिक ताकद नसेल तर हे न बघणं टाळता येणं अवघड जातं. आणि याचाच फार वाईट उपयोग यात केला जातो.

लोकांना निष्क्रिय बनवणं, स्पर्धकांवर वाटेल त्या पातळीवर जाऊन उघड बोलता येणं, शिव्या घालणं, वाभाडे काढणं, त्यांची नैतिकपातळीवर बोलणे हे सगळे प्रेक्षकांना सहजी करता येतं, कारण ते खेळावर बोलणं असतं. व्यक्तीच्या मनातली सगळी गरळ इथे ओकता येते. खेळमारे अन प्रेक्षक दोघांनाही. आपापली नैराश्य, असमर्थता, चिड, संताप सगळी भडास काढण्याची ही हक्कीची जागा वाटू लागते.

सो या सगळ्यापासून कृपया दूर रहावे असे माझे मत. आपल्या मनातील नकारात्मकता वर काढणं कितपत चांगलं? बरं ती वर काढली म्हणजे एकदाची ओकून मी निर्मळ होते का? तर तसं हेत नाही, उलट अधिकाधिक पित्त तयार होतं. त्या एेवजी आपल्यातली सकारात्मकता वाढेल असं काही केलं तर? गाणी एेका, चित्र काढा, फिरायला जा, अंगमेहनत करा, खेळा, पळा, मुलांशी खेळा, गप्पा मारा, किंवा सरळ शांत झोपा.


अर्थात हे अवघड आहे. मनाला उचकवणारं जास्त आकर्षक असतं. तर मनाला शांत करणारं निष्क्रिय वाटू शकतं. हा प्रत्येकाचा आपापला कंफर्ट झोन. कोणाला वरणभाततूपलिंबु आवडतं तर कोणाला तांबडारस्सा अन नळी. फक्त आपल्याला काय सोसतं ते आपणच ठरवायचं. आपलं तारतम्य आपणच ठरवायचं अन आपणच भोगायचं. 

No comments:

Post a Comment