Friday, February 17, 2017

आपलाचि संवादु आपणासि : मी कशी


आपलाचि संवादु आपणासि असंच हे सगळं लिखाण! कधी आयुष्याकडे वळून बघेन, कधी मनात डोकावेन, कधी विचारांना तपासून बघेन, जसं जमेल तसं स्वत: लाच शोधत जाईन. आता हे इथे का लिहिणार? तर कधी कधी काही पोस्ट वाचताना जाणवतं, की इथूनच मी जात होते, गेले होते, धडपडले होते, तेव्हा कोणी हात दिला, नाही दिला, कधी माझी मीच शोधत, सापडवत, तयार करत गेले होते. ते सगळं वाचताना एखादीला एखादं वाक्य उपयोगी पडलं तरी? पडेलच उपयोगी असही नाही, पण वाचायला आवडलं तर, म्हणून इथे लिहितेय. मी काय फार महान लिहितेय ही भूमिका नाही, नाहीच! जस्ट मनातलं शेअर करतेय.

माझ्या आयुष्यातली फार मोठी गोेष्ट,  जिने मला घडवले ती म्हणजे मी स्वत:ला ओळखलं. आता यात काय वेगळं? तर हो, होतं वेगळं.  मी मला जे समजत होते,  मला आरसा जे दाखवत होता ते वेगवेगळं होतं. किंबहुना मी जशी असायला हवी त्यांचं इतकं दडपण होतं माझं माझ्यावरच की त्यामुळे खऱ्या मला मी फार फार उशीरा ओळखू लागले.

लोकं म्हणतात तशी मी आहे, या समाजात वावरताना मी अशी वावरले पाहिजे म्हणून मी ही अशी आहे असे विविध गैरसमज मनात होते. पण मग तसं वागताना फार ओढाताण व्हायची. मी म्हणजे 1,2,3,4,... य गोष्टी अशी प्रतिमा मनात तयार झालेली. आणि मग मी 2 एेवजी अडिच वागले की गडबड सुरु व्हायची.  मग आयुष्याच्या एका टप्यावर हे गणित उलगडत गेलं.

अरे गोरं असणं म्हणजेच सौंदर्य नाही. मुलगी असून विविध खेळ खेळता येणं हे काही वाईट नाही. कब्बडी खेळणं, झाडावर चढता येणं, फ्युज बसवता येणं यातून मी पुरषी आहे हे नाही ध्वनित होत. घरातल्या सगळ्यांनी सायन्स साईड निवडलीय आणि मी आर्ट्स निवडलीय याचा अर्थ मी बुद्धिमत्तेने कमी आहे असा नाही होत..... असे कितीतरी शोध लागत गेले. एनलाईटनमेंटच की ही एका अर्थाने    :)

अन मग मात्र मी स्वत: ला शोधलं, खऱ्या स्वत:ला शोधलं.
माझं दिसणं, माझा रंग, माझं शिक्षण, माझ्या आवडी, माझे छंद, माझे विचार, माझे कंफर्ट झोन्स, मला सहन न होणाऱ्या गोष्टी, मला राग येणाऱ्या गोष्टी, मला संताप येणाऱ्या गोष्टी, मला आनंद देणाऱ्या गोष्टी, मला नकारात्मक करणाऱ्या गोष्टी, मला सकारात्मक करणाऱ्या गोष्टी, मला शॉर्ट टर्म मधे काय हवय, लॉंग टर्म मधे काय हवय, काय केलं तर चालेल,...... असंख्य गोष्टी लिहून काढल्या, दहा वेळा विचारलं, हे खरच मनापासून की कोणत्या दडपणातून? जोवर मनातून हुंकार आला नाही, तो वर खोडत राहिले. लिहित राहिले. अजूनही हा खेळ चालूच आहे. पण मूळ ढाचा आता तयार झालाय. डिटेल्स कधी हलतात, जातात, परत येतात. पण आता जे घडतं ते बरचसं कॉंशस लेव्हलला. सो त्याची पण एक मजा येते. आधी सगळंच अंदाधुंदी असायचं मग सगळीच चिडचिड, निराशा, राग, वैताग, अपमान, मी कोणाला आवडतच नाही अशी सगळी नकारघंटा वाजत रहायची. आता कमी होतं असं.

एव्हाना मी जशी आहे, अगदी जशी, आहे तशीच्या तशी मान्य केलंय. विदाऊट एनी रिग्रेट्स! अन मग आयुष्य कितीतरी टप्यांवर, कितीतरी लढायांवर सोपं होऊन गेलं. मनातली सगळी नकारात्मकता हळूहळू विरू लागली. येणारी प्रत्येक अडचण ही स्वत:ला, स्वत:तल्या गुणांना पारजून बघण्याची संधी म्हणून पहात गेले. आयुष्यातील कितीतरी अपयश पचवताना मनात कटुता राहिली नाही, उलट या अपयशांनी माझ्या सीमा जास्त अधोरेखित केल्या याची कृतज्ञताच मनात राहिली.

स्वत:ला खरच नीट ओळखायला शिकले. स्वत: बद्दल जजमेंटल होऊ होऊ दिलं नाही . +/- अशी यादी न करता. स्वत:ची स्वभाव वैशिष्ट्ये ओळखायचा प्रयत्न केला, लिहून काढली.  आणि ती जशी आहेत तशी मान्य केलं, अभिमानाने. मग मनातलं नैराश्य, नकारात्मकता, अपयश, अपमान सगळे निवळत गेलं. स्वत:शी खोटं बोलणं सगळ्यात सोप्पं असतं. पण तेच टाळलं.  स्वत:ला फसवणं थांबवलं.  यस मी आहे ही अशी आहे!

वाटलं पुन्हा कधी तर लिहेनही, किंवा नाहीही. आतला संवाद मात्र नक्की करत राहिन   :)

No comments:

Post a Comment