Monday, July 11, 2016

मनातले काही...

कोणाला अरुपाचे वेड तर कोणाला अगम्यचे तर कोणाला अनोळखीचे... कसलेही चालेल पण हे वेड हवे. जगण्याची, आसुसून जगण्याची ही वृत्ती हवी. हा शोध हवा, ही नवीन, माहिती नसलेले कळून घेण्याची उर्मी हवी. "अजून काहीचा" सोस हवा. समजून घेण्याची अतृप्तता हवी. मग मजेचाच होतो प्रवास.

अचंबित होणं, चकित होणं, आनंदित होणं, अगदी कदी कधी नाराज होणं, हतबल होणं हे ही असावंच या प्रवासात. तरच पुढे काय याची उत्सुकता असेल, नव्याने काही करून बघण्याची वृत्ती असेल. मग आहेच सारा प्रवास मजेचा, उत्सुकतेचा अन आल्हाददायकही.

येतील काही खाचखळगे, काही अनोळखी टापू, काही अगदीच न समजणारी वळणे-वाटा. पण तरीही थोडं पुढे जाऊन धुंडाळावंच. अगदी नाहीच समजलं; नाहीच ठिकाण सापडलं,  तर ठिके! नवीन वेगळी वाट होती काहीतरी; अनोळखी, गुढ, अनाकलनीय अशा गोष्टींचे असणे जाणवणे हे ही किती सुंदरच की.

ती एक समजअसमजाचा मनातली हुरहूर ही कित्येकदा काही सृजन करणारी, कित्येकदा मनाला ढुशा देणारी. ती पण अनुभवावीच की. अगदी न समजूनही अनुभवता येते कोणतीही गोष्ट. अन अशा अनुभवाची जास्त गोडी! कारण त्यातून हजारो वाटा आभासी का होईना जाणवतात.

स्पष्ट दिसली तर ती ठळक पण एकच वाट राहिल. त्यापेक्षा ही कसल्या कसल्या धुक्यात हरवलेली वाट मला जास्त भावते, कारण ती कितीतरी संभाव्यता जागवते. माझ्या विचारांना कितीतरी  प्लॅटफॉर्म देते. ओळखीचे, अनोळखी, अगदी अशक्य विचार करायला उद्युक्त करते.
मी अनोळखी, न समजणारे वाचते, पाहते ते या साठी!


No comments:

Post a Comment