Thursday, March 17, 2016

मतवारो बादर आयो...

(माननीय वीणा सहस्रबुद्धे यांची ही चिज ऐकताना मनात आलेले ...
संध्याकाळ झाली. दिवसभर रणरणते ऊन आता उतरले, उधळलेला वारा, कोठून कोठून मेघ गोळा करू लागला. साऱ्या दिशा एक झाल्या. अंधारालाच दृष्टी मिळाली. सारा आसमंत काळी पैठणी नेसुन बसलाय.
सगळ्या ढगांचा एकच गूढ धीर गंभीर आवाज नुसताच घुमु लागला. पण त्यातून  त्याचा कोणतीच संदेश ऐकू येत नाहीये.

त्यातच गवाक्षाच्या किनारीवर कोकीळ येऊन साद घालू लागला. वेगवेगळ्या ताना घेऊ लागला. माझ्या मनातली हूरहूर जणु त्याने ओळखली. माझी हरप्रयत्ने समजूत घालु लागला. माझी संपलेली आशा पुन्हा जागी करू लागला. आपल्या सुरेल तानांनी अजून आशा दाखवू लागला. नको निराश होऊस, अजून रात्र आहे, येईल त्याचा संदेश. थांब धीर नको सोडूस , सांगू लागला. मला धीर शिकवत सुरेल ताना घेत राहिला.

मेघ मात्र माझी हूरहूर वाढवत अजून झाकाळून येत होता...

तशात त्या अंधारातच विजेची किनार चमकून गेली. माझ्या दु:खाच्या पैठणीचा झळाळला केशरी पदर... सोसाट्याच्या वाऱ्यात भरभरणाऱ्या साडीत चकाकणाऱ्या त्या शंकांनी, मन पुन्हा भरून गेलं.

खरच येईल का तो? की पुन्हा आजही विरहच आहे सोबतीला? मनातला एकटेपणा, विरागी एकटेपणा धीरगंभीर होत गेला. एक विरक्ती दाटून आली, त्या त्या काळ्या मेघासारखी ....

मीरेच्या मनाला अगदी ओळखीचीच ती....

2 comments: