Monday, December 7, 2015

हसत खेळत क्वालिटी टाईम

मी नोकरी करत होते, शिवाय बाळंतपणात अन नंतर  भरपूर सुट्ट्या झालेल्या. त्यामुळे मुलगा मोठा होत असताना सुट्या अतिशय जपून वापाराव्या लागत. तशात आमचे जरी कॉलेज असले तरी डिस्टन्स मोड मधले असल्याने वेळही ११-५ अशी असायची. शिवाय घरी पेपर चेकिंग साठी आणणं क्रमप्राप्त असायच. घरी सासु सासरे, नवरा आयटी मध्ये. सो बराच वेळ घरातल्या कामासाठी लागायचा. माझ्या सासर्‍यांचा स्वभाव तिखट आणि हट्टी आणि सासुबाई अतिशय हळुबाई . मुलाला सांभाळायला दिवसभरासाठी बाई(मावशी) ठेवल्या होत्या पण त्यांना फक्त लेकाला सांभाळायचच काम होतं. त्यामुळे अनेक कामं माझ्याच अंगावर असत.
या सगळ्या रामरगाड्यात लेकासाठी फार कमी वेळ होई मला. त्याला अनेक गोष्टींची सवय लावणं, नवीन गोष्टी शिकवणं यासाठी वेगवेगळे मार्ग मला हाताळावे लागले. तेच तुमच्याशी शेअर करतेय. यात माझी हुषारी नाही तर त्या त्या वेळेची ती गरज होती, ती निभावली.इतकच.

मुलगा शाळेत जाऊ लागला आणि मग माझा आणि त्याचा भेटण्याचा वेळ अजूनच कमी झाला. त्याची शाळा सकाळी होती. त्यामुळे मग फक्त संध्याकाळचाच वेळ हाताशी राहू लागला. त्यात त्याचा अभ्यास, स्वयपाक, बाजारहाट,... यातून मार्ग काढायचा कसा हा मोठा प्रश्न उभा राहिला. मग काही गमतीजमतीचे प्रयोग सुरू केले.
सकाळी मुलगा शाळेत गेला की स्वयपाक, माझी तयारी झाली की अर्धा एक तास हातात असायचा. मग त्या वेळेस मी मुलगा घरी आला की काय काय करेल याची तयारी करून ठेवायला लागले.
आल्यावर जेवणे, मग नुसतेच खेळणे होई. त्या ऐवजी मी ठरवून काही गोष्टी करू लागले. पण रोज काही बदल असेल याची काळजी घेत असे. त्यातल्या काही गोष्टी खालील प्रमाणे
१. जेवताना मावशींनी एक गोष्ट वाचून दाखवायची. ती मी ठरवून ठेवत असे. सहसा या गोष्टी त्याच्या आवडीच्या ठेवत असे.
२. जेवण झाले की साधारण अर्धातास त्याला हवा तो खेळ खेळणे.
३. नंतर एखादे,मेकॅनोच ठरवलेला आकार तयार करणे.
४. मग थोडी झोप.
५. उठल्यावर दूध. आणि (३)केले असेल तरच आवडती कार्टुन- अर्धा तास
६. तो सायकल खूप लहानपणापासून चालवायला लागला. तर थोडावेळ सायकल. बहुदा तेव्हाच माझी यायची वेळ असायची.
७. बाजारहाट करताना त्याला पैसे द्यायाला, घ्यायला शिकवत असे. हळुहळू बेरिज वजाबाकी , छोटा हिशोब तो शिकत गेला.

लेक तिसरीत असताना माझ्या सासर्‍यांना ( हो, मला नाही सासर्‍यांना) स्वतंत्र रहायच होतं म्हणून त्यांचे सगळे घर वेगळे लावून दिले. या सगळ्या प्रकरणामध्ये मी, नवरा, लेक सगळेच थोडे डिस्टर्ब होतो. त्यात नव्याने सगळा संसार पुन्हा उभा करायचा होता. नवर्‍याचा नवीन व्यवसाय, त्याचा खूपच वेळ तिथे जात होता. आर्थिक तंगी अशा अनेक गोष्टी एकाच वेळेस आलेल्या. घरात कोणीच नसल्याने काही दिवस लेकाला पाळणाघरात ठेवले. पण तिथे तो रमेना. एक चांगले होते की आम्ही माझ्या कॉलेजच्या कँपसमध्येच रहात होतो. मग लेक म्हणाला मी एकटा राहीन. हे खूपच धाडसाचे होते. जेमतेम ९-१० वर्षाचा मुलगा, एकटा घरी ठेवायचा. पण मन घट्ट केलं. त्यातून माझ्या ऑफिसमधून घराची गॅलरी दिसायची, आणि शेजारी मित्राचे आई, वडील, बायको असायचे.आया आधारावर निर्णय घेतला. मग रोज एक वाजता लेक शाळेतून ऑफिसमध्ये यायचा, घराची चावी माझ्याकडून घ्यायचा अन घरी जायचा. आमच्या सरांनी परवानगी दिली त्यामुळे लंच ब्रेकला मी २-२.३० घरी जायची. हा असा द्राविडीप्राणायाम सुरू झाला. पण लेकाला खूप जाणीवपूर्वक वाढवायचे हे निश्चित केले होते. म्हणून मग माझे अनेक उपक्रम सुरू झाले.
तो वर लेक नीट वाचू लागला होता. मग ट्रेझर हंट हा आमचा रोजचा खेळ ठरला. त्यात मग खूप वेरिएशन्स केली.
१. घरात वेगवेगळ्या चिठ्या ठेवायच्या. पहिल्या चिठ्ठीत दुसरीचा क्ल्यू, दुसरीत तिसरीचा.
२. ऑफिसमध्ये एखाद क्ल्यु द्यायचा ( एखाद्या गोष्टिच्या पुस्तकाचे नाव/ त्याच्या आवडत्या गाडी बद्दल बोलण/ घरातल्या वस्तूची काळजी घे सांगणं) मग तो मला सोडून पळत बंद घरात हसत शिरायचा. तो क्ल्यु शोधायचा, अन त्यातल्या प्रमाणे करायचा. यातून बंद घरात यायची त्याला नावड नाही आली, ना कधी भिती वाटली. आपले आपण काही करायची सवय लागली.कारण आणि घटना यांचा संबंध लावणं, लॉजिकल थिंकिंग सुरु झालं.
३. एकटाच असताना काय काय करायचं, साधं दार नीट बंद करण, कोण आहे हे विचारल्याशिवाय दार न उघडणं अशा गोष्टी तो शिकत गेला.
ट्रेझर हंट मधे कधी कधी मी मुद्दहून दोन क्ल्यु देत असे. एक सोपा पण अन उपयोगी. अन एक अवघड पण उपयोगी. पहिल्यांदा तो हिरमुसला. पण लंच अवर मध्ये आल्यावर त्याला थोडा वेगळा विचार कसा करायचा हे शिकवलं. मग दुसरा क्ल्यु त्याला मिळाला. अशातून एखादी अडचण आली तर त्यातून मार्ग कसा काढायचा हे तो शिकत गेली.
एक किस्सा सांगते. तो शाळेतून आला. मी घरी येऊन गेले अन मग त्याला तहान लागली, पाणी प्यायला स्वयपाक घरात गेला तर तिथे त्याला भींतीवर पाल दिसली. मग तो घाबरून पळत हॉल मधे आला. तहान तर लागलेली. मग त्याने आपली शाळेची बॅग उघडली अन त्यातल्या वॉटरबॅगेलले पाणी प्यायले. तेव्हढ्यात माझ्या बहिणीने फोन केला तर  त्याने लगेच सगळे मावशीला सगळे सांगितले. मलाच काय तिलाही फार कौतुक  वाटलेले तेव्हा त्याचे :)
४. अनेकदा एखादी गोष्ट पूर्ण केली तरच दुसरी मिळेल असे क्ल्यु दिले ( एखादे गणित पूर्ण केल्यावर आलेल्या उत्तराचा ड्रॉवर) त्यामुळे आपोआप गोष्टी पूर्ण करायला तो शिकला.
५. दिलेली अभ्यास पूर्ण केलास तरच आवडती कार्टुन बघ असे सांगितले. आणि ते निभावण्याची जबाबदारी त्याच्यावरच टाकली. स्वभावतः तो खूप खरं बोलणारा मुलगा आहे आणि त्याच्या प्रत्येक खर्‍याच आम्ही मान ठेवला. त्यामुळे एखादी गोष्ट त्याने केली नाही तरी तो खरे पणाने सांगे. यातून एखादी गोष्ट आपण "मिळ्वली" याचे महत्व तो शिकत गेला. शिवाय एक जबाबदारीची जाणीवही त्याच्यात हळुहळु येत गेली.
हे सगळे एकदम एका दिवशी नाही घडले. पण हळुहळू  त्याला या सगळ्याची सवय लावत गेले. आणि माझं एक ठाम मत आहे. मुलं मुळात गुणीच असतात. त्यांचे गुण आपण जोपासले हवेत. ते जोपासण्याचा मी केलेला हा एक प्रयत्न.
अजून आठवेल तसं लिहित राहीन.

No comments:

Post a Comment