Friday, July 3, 2015

शून्य गढ शहर, शहर घर बस्ती

हे कुमारांनी गायलेलं गोरखनाथांचे एक निर्गुणी भजन.

शून्य गढ शहर, शहर घर बस्ती
कौन सूता कौन जागे है
लाल हमरे हम लालान के
तन सोता ब्रह्म जागे है


जल बिच कमल, कमल बिच कलियाँ
भँवर बास न लेता है
इस नगरी के दस दरवाजे,
जोगी फेरी नित देता है

तन की कुण्डी मन का सोटा
ज्ञानकी रगड लगाता है
पाञ्च पचीस बसे घट भीतर
उनकू घोट पिलाता है

अगन कुण्डसे तपसी ताप
तपसी तपसा करता है
पाञ्चो चेला फिरे अकेला,
अलख अलख कर जपता है

एक अप्सरा सामें उभी जी,
दूजी सूरमा हो सारे है
तीसरी रम्भा सेज बिछावे,
परण्या नहीं कुँवारी है

परण्या पहिले पुतुर जाया
मात पिता मन भाया है
शरण मच्छिन्दर गोरख बोले
एक अखण्डी ध्याया है
              -गोरखनाथ
-------------------------
मला समजलेला भावार्थ :
नाथ संप्रदायातील  शून्य तत्वज्ञानानुरुप सगळे शून्यातून निर्माण झाले आहे अन सर्व शून्यातच विलिन होणार आहे.
हे शरीर जणु एक शहर आणि त्यातील आत्मा जणु वस्ती
ही वस्ती, आत्मा कोणाचा निद्रिस्त तर कोणाचा जागृत.

देव माझा अन मी देवाचा.
जेव्हा माझे शरीर- मी पण संपते, तेव्हा माझा आत्मा -ब्रह्म जागृत होते.

जीवनाच्या जलाशयात मोहाची कितीतरी कमळे, अन त्याची कितीतरी विलोभनीय रुपं. या मोहातून फिरताना आपल्या दाही इंद्रियांवर पहारा देत योग्याला पुढे जायचे असते.

शरीररुपी खला मधे आत्मारुपी बत्याने खल करत योग्याने ज्ञानाचा शोध घेत राहिले पाहिजे. सृष्टीतील पाच तत्व आणि बुद्धीची 25 क्षेत्र यांचा वेध घ्यायचा प्रयत्न करत राहिले पाहिजे.

या साऱ्या ज्ञानसाधनेच्या अग्नीमधे तप करत पाच तत्वांशी झगडत आमि स्वत:शी सतत संवाद करत योग्याने प्रयत्न चालू ठेवला पाहिजे.

योगी तपश्चर्या करत असतो तशी माया ती मोडण्याचा प्रयत्न करत असते. एक, दोन नव्हे तर अगदी रंभे सारखी मोहमायाही समोर उभी राहते.

आणि विवाहा आधीच पुत्रप्राप्तीचा आनंद त्याला मिळाला. पण अशा सापळ्यात गोरखला अडकायचे नाही, अन म्हणून तो आपल्या गुरुंना, मच्छिंद्रनाथांना मदतीचे आवाहन करतो आहे आणि स्वत:ला सावध राहण्याचा इशारा देतो आहे.
--------------
हे सारे एकताना मनात आलेले विचार...

म्हटले तर सगळेच शून्य, अन म्हटले तर सारे सार इथेच. म्हटले तर शहर, म्हटले तर गुढ गढी. एकच शरीर, एकच मन, एकच आत्मा, एकच कुंडलिनी, एकच ब्रह्म, एकच बस्ती... पण शून्य, जोवर हे सगळे जागृत होत नाही, तोवर सारे सारे शून्य.

म्हटले तर कितीतरी मोह, कितीतरी प्रलोभने, कितीतरी भोग, कितीतरी तत्व, कितीतरी विचार अन कितीतरी तत्वज्ञानं अन कितीतरी ज्ञानाची द्वारे,  अन अजून कितीतरी अनुभूती....

आणि तरीही सगळे पुन्हा शून्यातच विलिन होणारे. शून्यवतच सगळे...
शेवटी हा सगळा आतल्या आतला संवाद, वाद, खल, झगडा... आपला आपल्यालाच सोडवायचा. आपलाच पहारा आपल्यावरच. आपलीच मोहमाया आपणच दूर करायची. आपल्या सुखाच्या मर्यादा ओलांडायच्या आपणच, अगदी पार व्हायचे, आपले आपणच.

 अधिकार नसतानाच सगळे सुख मिळवण्याची हावही आपली अन ती आवरण्याची धडपडही आपलीच. स्व निर्मितीचा आनंद, त्या निर्मितीवरचा अधिकार, हक्क  हाही सगळा एका भोगाचाच भाग.... तो ही पुन्हा शून्याकडेच जाणारा.

ह्या शून्यप्राप्तीचा हा प्रवास, तो ही शून्यच... फक्त त्याची जाणीव होणं, राहणं, सतत ठेवणं हे त्या शून्याचे संपूर्णत्व. ते अंगी येणे म्हणजेच शून्यत्व...

शून्याकडून शून्याकडची वाट मात्र फार फार मोठी....

No comments:

Post a Comment