Saturday, January 31, 2015

"उंच उंच झोका... " : भाग - १

त्या दिवशी कॉलनीतल्या मावशीं कम मैत्रिणीचा फोन आला, "एका पुस्तकाच्या प्रकाशनाला येतेस का ? माझ्या एका मैत्रिणीवर एक लेख आहे त्यात. " मी लगेच तयार, अशी संधी मी कशी सोडेन  :)
अन ती संध्याकाळ मला खुप खुप काही देऊन गेली. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक चढ उतार असतात, अनेक अडथळे असतात, अनेक दु:ख असतात, अगदी टेकीला येण्याइतकी परिस्थिती ही असते. या अशा परिस्थितीत अतिशय मार्गदर्शक, उत्साहवर्धक अन झगडण्याची प्रचंड ताकद देणार्‍या कितीतर मैत्रिणी मला सापडल्या त्या दिवशी. अन त्यांचे झोके दाखवणारे पुस्तक आले माझ्या हाती ! "उंच उंच झोका...कर्तृत्वाचा..."
वेगळ्या वाटेवरून चालण्याची इच्छा असणार्‍या सर्वांना समर्पित असलेले हे पुस्तक म्हणजे लोकसत्तातील 'चतुरा' या पुरवणीसाठी शुभदा पटवर्धन यांनी पाच वर्षात घेतेलेल्या निवडक २४ कर्तृत्वशालिनींच्या मुलाखतींचे संकलन !
यातल्या कित्येक आपल्या अगदी माहितीच्या तर काही प्रसिद्धीच्या झोतापासून कितीतरी दूर. पण प्रत्येक जण, खणखणीत नाणं. शुभदाताईंनी या सगळ्यांना इतकं छान बोलकं केलय की जणूकाही या सगळ्या आपल्या कित्येक वर्षांच्या जुन्या मैत्रिणी असाव्यात असा भास होत राहतो वाचताना. प्रत्येकीचा पोत वेगळा, स्वभाव वेगळा, क्षेत्रे वेगळी पण या सगळ्यांना आपलसं करतात शुभदा ताई ! बरं या मुलाखती कुठेही "मुलाखत" या छापील पद्धतीच्या नाहीत. त्यातून त्या त्या व्यक्तीचे अंतरंग आपल्या पर्यंत पोहोचते. अन प्रत्येक लेख आपण शब्दन् शब्द अनुभवत जातो. प्रत्येकीच्या मनाच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग किती अवघड, पण शुभदा ताईंनी हे आव्हान अतिशय लिलीया अन अतिशय आपलेपणाने केलेय !
१. पहिल्यांदा आपण भेटतो, सानियाला"इथेच टाका तंबू" मध्ये. अगदी नावाच्या स्पष्टीकरणापासून ही लेखिका पटत जाते, उलगडत जाते. " मैत्र जुळावं अशी इच्छा असेल तर नाती निर्माण होतात, संवाद साधले जातात. ते जाणीवपूर्वक वाढवायचे- जोपासायचे असतात." या सारख्या संवादातून सानियाला मानव-मानवी संबंध, त्यातली नाती यात रस आहे हे लक्षात येते. समाज, सामाजिक संदर्भ, घटना, परिणाम बदलतात पण मानवी संबंध चिरंतन आहेत, यावर तिचा नितांत विश्वास आहे. साहजिकच तिच्या लिखाणातील व्यक्तिरेखा विचार करणार्‍या, स्वतःचा शोध घेणार्‍या, स्वातंत्र्याची आस असणार्‍या आहेत. मानवी संबंध चिरंतन आहेत अन हा माणूस शोधण्याची ही प्रक्रियाच लिखाणाचे रूप धारण करते. साहित्य पातळिवरचे लिखाण हा आतून घेतलेला शोध असतो. आपल्या जडण घडणीचे सारे श्रेय ती आपल्या घरातील मोकळ्या- खुल्या वातावरणाला देते. मराठी अन इंग्रजी भाषेबद्दलचे तिचे विचारही खुप काही सांगून जाणारे.
जाता जाता शुभदाताई मांडतात की, " गौरी देशपांडे, सानिया, आशा बगे, मेघना पेठे,... स्त्री प्रतिमेला एक वेगळं परिमाण देण्याचा प्रयत्न केलाय प्रत्येकीने. प्रत्येकीची ताकद, बलस्थानं, वेगळी, आकृतीबंध वेगवेगळा पण एकाच वाटेवरच्या या सगळ्या सहप्रवासिनी ! "
२. मग भेट होते ती मेघना पेठेंची, "परीसस्पर्शा"तून ! ' व्यक्ती हे आचार्-विचारांचं असं एक संमिश्र रसायन असतं, जे स्वभावतःच एकमेकाद्वितीय असतं. हा नेमका वेगळेपणा अधोरेखित करणं, या प्रक्रियेत येणारं तुटलेपण वेधणं हा मेघनाच्या लिहिण्यातला मुख्य सूर. " म्हणूनच तिच्यावर आधुनिक बंडखोर विचारांची, वेगळ्या वाटेने चालणारी, पोस्ट मॉडर्निझमकडे झुकणारी अशी अनेक बिरुदं लावली गेली. मेघनाच्या मते तिचे हे घडणे घरातले मुक्त्-स्वतंत्र वातावरण आणि वडिलांची विचारप्रणाली यातून झाले. " निर्णय तुमचे तुम्ही घ्या, ते स्वातंत्र्य तुमचे. पण त्या निर्णयाची जबाबदारीही घ्या." हा वडिलांचा दृष्टीकोन तिचे आयुष्य घडवत गेला. तिच्या लिखाणातील बोल्डपणा, मुख्यत्वे लैंगिक संबंधांबद्दल येणार्‍या वर्णनांबद्दल सुरुवातीला खुप आक्षेप घेतले गेले. प्रत्यक्ष कथेमधल्या पात्रांच्या आयुष्याचे जे तुकडे चित्रित झाले; त्यात शरीर संबंध हा त्यांचा सहज, वेगळा न करता येणारा भाग आहे. आणि त्यामुळे अपरिहार्यपणे आलेला आहे. प्रत्येक कथेत त्याचे स्वरूप कितीतरी वेगवेगळे आहे. निव्वळ शरीरलालसा, गरज, समर्पण, स्वीकार, निरिच्छता, कर्तव्यभावनेतून येणारा कंटाळा, सूड, एकटेपणावर मात, चटोरपणा, पूजा.... एकाच शरीर-क्रियेमागची ही विविधता- त्या त्या पात्राच्या आयुष्याशी निगडित होऊन येतात; त्या त्या पात्रांच्या जीवनाचे ते अविभाज्य अन त्यांचे व्यक्तित्व घडवणारे घटक म्हणून येतात. अन शेवटी वाचकाची गरज, त्याचा अनुभव आणि त्याच्या प्रगल्भतेवर त्याची प्रतिक्रिया अवलंबून राहते.
तिच्या लिखाणात येणारे आणखीन एक महत्वाचे वेगळेपण म्हणजे तिची पात्रे वापरत असलेली भाषा - स्त्री-पुरुषांची भाषा प्रचंड ऑथेंटिक वाटत राहते 
तिच्या थिएटरमधील अनुभवांचा फायदा तिच्या लिखाणाला झालेला फायदाही ती नमुद करते.
३. संधीच्या पावलांचा हळुवार आवाज टिपून तिचे खुल्या दिलाने स्वागत करणार्‍या उमा कुलकर्णी भेटतात नंतर आपल्याला !
बेळगावमध्ये वाढलेल्या उमाची लहानपणापासून कन्नड भाषेशी ओळख होती. पण लग्न ठरताना विरुपाक्ष कुलकर्णींनी अट घातली की जरी पुण्यात असलो तरी घरात कन्नडच बोलायचं; तेव्हा कन्नडशी खरी दोस्ती सुरू झाली त्यांची.
प्रत्यक्षात फाईन आर्टस ची कलाकार, त्यातील अभ्यास - अगदी पेंटिग्जमधील पीएच. डी. करायला सुरुवात करणारी ही कलाकार उमा ! पण लग्नातल्या या अटीने सारे विश्वच पालटून गेले. उमा- विरुपाक्ष या दोघांचे पुस्तकप्रेम आणि कन्नड भाषाप्रेम अन त्यासाठी एकमेकांना मराठी- कानडी उत्तम साहित्य वाचून दाखवणं यातून उमा शिवराम कारंथ यांच्या साहित्याकडे वळल्या. आणि सुरू झाला भाषांतराचा प्रवास !
उमा कन्नडमधले उत्तम साहित्य मराठीत आणत होती अन विरुपाक्ष मराठीतले उत्तम साहित्य कन्नडमध्ये उलगडत होते. या त्यांच्या प्रवासाची, चुकले सहप्रवासाची कथा वाचकाला थक्क करून सोडते. उमांना कन्नड वाचता येत नसे म्हणुन विरुपाक्ष स्वतः त्यांना सगळी कन्नड पुस्तकं वाचून दाखवत. उमांना भाषांतर करायला उपयोगी पडावं म्हणून ते पुस्तकंच्या पुस्तकं वाचून टेपवर रेकॉर्ड करून ठेवत. बायकोच्या लेखनासाठी अशी मेहनत घेणारा नवरा विरळाच नाही !
या भाषांतर प्रक्रियेत स्वतंत्र साहित्य निर्मिती राहून गेली याची उमाला खंत नाही वाटत. अन मूल नसण्याची खंत तिने जाणीवपूर्वक काढली. उमा अन विरुपाक्ष यांच्यातल्या घट्ट मैत्रीनेच हे शक्य झाले. यांच्या मैत्रीला आणखीन एकाची जोड आहे अन ती म्हणजे डॉ. अनिल अवचट यांच्या मैत्रीची हे ती आवर्जून सांगते.
प्रत्येकाच्या मनात इतके आतपर्यंत डोकावण्याचे हे कौशल्य शुभदाताईंसारख्या काहींनाच सर्‍हुदय अन हळुवार लोकांनाच जमू शकते, नाही !
४. घराला घरपण देणार्‍या डि एस के समूहातल्या ' वहिनी' म्हणजेच हेमंती कुलकर्णी ! डि एस के समूहाच्या वाटचालीचा आढावा घेताना वहिनी आपला जीवनातला अनुभव आपल्याशी वाटतात. " चांगल्याचे कौतुक करा, चुकीचा जाब विचारा; कशाही पद्धतीने का होईना केल्या कामाची दखल घेतली जाणं हे महत्वाचे असते. याचा कर्मचार्‍यांच्या कामावर, विचारांवर. कार्यसंस्कृतीवर सकारात्मक परिणाम होतोच! "
डि एस केंच्या स्वभावाचं अतिशय नेमकं विश्लेषणही त्या करतात. मार्गदर्शन करणं, तेही न चिडता, शांतपणा, कंटाळा न येता परत परत समजावून सांगणं, प्रामाणिकपणा, स्पष्टवक्तेपणा, नीटनेटकेपणा, कष्टाळूपणा - किती साधे अन सोपे उपाय! पण त्यानेच एक मोठा माणूस कसा घडतो याचं किती चपखल उदाहरण !
स्वतः फुलत अन दुसर्‍याला फुलवत जाणारी अशी या दोघांची वाटचाल ! दोघांत काही तात्विक मतभेदही आहेत- जसे मुलांनी व्यवसायात येऊन शिकावं की आधी शिकून मग व्यवसायात यावं- पण तरीही एकमेकांवरच्या विश्वास या सर्वाच्यावरती आहे !
व्यावसायिक यश हाती येत असताना अनेक छोट्या छोट्या आनंदावर पाणी सोडावं लागलं ही हूरहूर आहे पण त्याच जोडीने आता त्यातले काही आनंद मिळवण्याचा हुरुपही आहे अशी ही सदाबहार 'वहिनी' !
५. एखादीचं सारं आयुष्यच असं असतं की वाचताना प्रत्येक अक्षराला डोळ्यात पाणी साचावं ! आयुष्यात जे हक्काने अन सहजी मिळावं त्याही साठी पोरक्या झालेल्या अन तरीही जिद्दीने जगण्याचे सोने करत जाणारी ही नंदिनी वझे आपल्याला भेटते ती 'अकल्पित सारे' सांगताना!
वडिल लहानपणीच गेले. नोकरी, घर मुलगी हे सगळे एकटीला झेपेना तशी आईने नंदिनीला सेवासदन अनाथाश्रमात ठेवले. याही परिस्थितीत तिला आठवतात त्या आश्रमात तिचे कपडे वाळत घालणार्‍या आणि तिच्या लांबसडक केसांची वेणी घालणा॑र्‍या रेखा ब्रह्मभट या मुलीची ! जी आपल्या जीवनात सहज होणारी गोष्ट ती एखादीच्या आयुष्यात अशी मनात कोरली जाणारी आठवणीत व्हावी... खरच अकल्पित... !
आश्रमात सहावी सातवीतच इस्त्री करून कमावत्या झालेल्या या मुलीपुढे अकरावीनंतर काय हा प्रश्न उभा राहिला, कारण त्या नंतर आश्रमाची सोय बंद होणार होती. पण त्याच वेळेस रामचंद्र वझे आणि त्यांच्या आईंशी त्यांची ओळख झाली. अन वझेंच्या आईंनी पुढाकार घेऊन नंदिनी आणि रामचंद्र यांचे लग्न झाले.
लग्नानंतर वझेंची नोकरी बरी असल्याने अन आपल्याला जे भोगावे लागले ते आपल्या मुलांना भोगावे लागू नये म्हणून नंदीनी घरीच राहिली. पण शिकत राहिली. पदवी, दोन मुलं, सासू, नवरा अशी सगळी सुखं हाती येतात असं वाटेपर्यंत वझेंची नोकरी अचानक सुटली अन हा धक्का सहन न होऊन वझेनी सिगारेटला जवळ केलं अन लवकरच मृत्यूलाही !
दरम्यानच्या काळात डबे तयार करून देण्याचा व्यवसाय नंदिनीने सुरू केला होता. पण वझेंच्या आजारपणात तोही व्यवसाय थांबवावा लागला, तशात होती नव्हती ती सर्व पुंजी त्यांच्या आजारपणात खर्च झाली.
लहानपणापासून एक खुप मोठी गोष्ट नंदिनीने अंगात बाणली होती, " आपल्यावर कोसळलेल्या संकटांचा बाऊ केला की, ते संकट आपल्यापेक्षा मोठं होतं आणि आपल्याला गिळंकृत करून टाकतं. संपवून टाकतं. हीच गोष्ट मुळात टाळली की, आपण त्यातून बाहेर पडतो. शिवाय कोणतही संकट आपल्या आयुष्यात कायमचं ठाण मांडून बसायला आलेलं नसतं. त्याचा- तुमचा सहवास असतो तो पल, दो पलका. त्यात ते त्याचे सारे रंग दाखवते. पण त्यातून तावून सुलाखून आपण बाहेर पडतो ते अधिक कणखर होऊन. अनुभवसिद्ध होऊन. त्यामुळंच 'संकटांपेक्षा आपण मोठं व्हायचं, मग ते संकट आपोआपच छोटं होतं' !" यावर विश्वास ठेवत नंदिनीने परत कंबर कसली.
या तिच्या वाटचालीत अनेक सर्‍हुदयांनी तिला मदत केली, साथ दिली. त्यातलेच एक, वझेंचे मित्र, श्री. अरुण मोरे. नंदिनीच्या पायाच्या ऑपरेशनच्या निमित्ताने मोरे साहेबांना नंदिनीची बिकट परिस्थिती लक्षात आली. ती बरी झाल्या नंतर मोरे साहेबांनी नंदिनीवर त्यांच्या प्रोडक्टसच्या मार्केटिंगची जबाबदारी सोपवली. खरं तर मार्केटिंगचा कोणताच अनुभव गाठीशी नसताना हे कसे जमवायचे हा प्रश्न होता. पण अंगच्या कष्टाळू अन सगळे शिकण्याची जबरदस्त इछा असणार्‍या नंदिनीने हे आव्हान स्विकारले. रस्ट कन्वर्टर्चा हा प्रॉडक्ट विकण्यासाठी आधी त्या प्रॉडक्टची सगळी शास्त्रीय माहिती जाणून घेणं, रस्टिंगची माहिती घेणं, नंतर त्या प्रॉडक्टची विश्वासार्ह्यता स्पष्ट करण्यासाठी साइटवर जाणं, बरं या साईट्स म्हणजे समुद्रातल्या बोटी- जिथे संपूर्ण पुरुषांचं विश्व. तिथल्या इंजिनियर्ससारख्या तज्ञांना पटवून देणं, त्यासाठी प्रत्येक ऋतूसाठी टेस्टस असल्याने वर्षभर तेथे भेटी देणं, अगदी उडी या ठिकाणी, जिथून पाकिस्तानची सीमा दीड कि.मी. वर आहे अशा ठिकाणी जाणं. बुलढाण्याच्या रेडियल गेटवर जाणं, दूरदर्शनच्या टॉवर्स वर शिडीने वरपर्यंत चढणं, थर्मल पॉवर स्टेशनमध्ये ७०० मीटर खाली काम करणं, या आणि अशा अशक्य वाटणार्‍या साईट्स्वर नंदीनी काम करते. या सर्व ठिकाणी तिला अगदी रेड कार्पेट ट्रीटमेंट मिळते हे ती आवर्जून सांगते. तिच्यासारख्या बाईने वरवर पाहणी केली तरी चालू शकेल असं सांगितलं जातं हेही ती सांगते, अन तसं न करता ती प्रत्येक ठिकाणी दक्ष रहाते याचं कौतुकही केलं जातं हे ही ती सांगते.
आपल्यावर कोसळलेल्या कोणत्याही संकटाची जराही कुरकुर न करता त्याचे कोणतेही अवडंबर न वाजवता नंदिनी आपल्याला खुप काही शिकवत जाते !
६. अगदी वेगळ्याच क्षेत्रात विहरणारा 'हंस अकेला' म्हणजेच डॉ. प्रतिक्षा नामजोशी. अत्यंत हुषार अगदी मेरिटमध्ये येणार्‍या प्रतिक्षाने प्रिव्हेंटिंग मेडिसीनसारखी वेगळी वाट स्विकारली. त्यातही कार्डिऑलॉजी हे क्षेत्र तिने निवडले अन इन्स्टिट्युट ऑफ प्रिव्हेंटिंग कार्डिऑलॉजी सुरू केली.
प्रतिक्षाचा नवरा डॉ. दिपक नामजोशी- एक प्रतिथयश कार्डिऑलॉजिस्ट ! एका अतिशय गरीब घरातल्या एका पेशंटला बायपास करणं आवश्यक आहे हे जेव्हा नक्की झालं तेव्हा त्या रुग्णाने त्याला हे शक्य नसल्याचे सांगितले. त्याच्या हातावर सार्‍या घराचे पोट अवलंबून असलेल्या या रुग्णाला हा सर्व खर्च अन वेळ देणं शक्यच नव्हतं. त्याची ही परिस्थिती प्रतिक्षाने पाहिली, समजून घेतली. अन ही केस तिनं प्रिव्हेंटिंग कार्डिऑलॉजीने हँडल करायची ठरवली.
पथ्य, व्यायाम, विशिष्ठ आहार या आणि अशा प्रिव्हेंटिंग कार्डिऑलॉजीने डॉ. प्रतिक्षाने त्या रुग्णाला अक्षरशः मृत्यूपासून ओढून आणले. आज अनेक रुग्ण तिच्या मार्गदर्शनाखाली आपला आजार आटोक्यात आणताहेत. असे आजपर्यंत ६०० क्रिटिकल पेशंट्स तिने बरे केले आहेत. एकी कडे घर, संसार , दोन जुळ्या मुली अन दुसरी कडे इन्स्ट्युट्युट ऑफ प्रिव्हेंटिंग कार्डिऑलॉजीचा संसार ! या दोन्ही आघाड्यांवर आज प्रतिक्षा यशस्वी वाटचाल करतेय.
७. कॅमेरामागची अपर्णा धर्माधिकारी ! कॅमेरामागचे विश्व आजपर्यंत प्रामुख्याने पुरुषांचे. एकतर ते काम तसे ताकदीचे, ट्रॉली हलवण्यापासून अवजड- भलेमोठे कॅमेरे उचलण्यापर्यंत - तसे सगळेच जड काम ! पण अपर्णाने ते पेलले. इतकेच नाही अगदी त्या जगाली भाषाही वेगळी - बेबी को लेके आव ( बेबी = कॅमेरा) , बेबी की मुंडी काटकर निचे लाव...! तिथली उंचीही वेगळी - टॉप अँगल लावताना अक्षरशः उंच ट्रॉलीवरून खाली बघत शॉट घेणे.... पण या सगळ्यात अपर्णाने स्वतःला ढालले !
अपर्णाबद्दल लिहिताना शुभदाताईंनी एक खुप कळीचा मुद्दा मांडलाय. त्या लिहितात, "लग्न, संसार, मुलंबाळं हे स्त्रीच्या करिअरच्या आद येणारे मुख्य प्रश्न. या टप्प्यावरून पुढं एक तर खोल दरी असते किंवा उंच डोंगर असतो. याच चक्रात अडकून पडणारी स्त्री खोल दरीत जाते. तर या चक्राची सगळी व्यवधानं चतुराईने सांभाळून त्यातून वेळीच बाहेर पडणारी स्त्री उंच डोंगर चढायला लागते. या डोंगराची चढण नुसती उंच नसते, तर खाच खळग्यांची, काट्याकुट्यांची असते. पण त्याची या स्त्रीला पर्वा नसते. तिला दिसत असतं ते तिचं ध्येय. अनेक स्त्रिया हा अवघड डोंगर पार करून गेल्यात."
८. स्वतःला शोधणारी डॉ. ऋतुजा विनोद ! 'स्वीकृती कौन्सिलिंग सेंटरच्या संचालिका, डॉ. विनोद योग क्लिनिकच्या संचालिका आणि महर्षी विनोद रिसर्च फाउंडेशनच्या संयोजक असणार्‍या डॉ. ऋजुतांनी बधीरीकरण शास्त्रात एम. डी. केलं. नंतर सर्वंकष आरोग्यासाठी मनोशारीरीक व्याधी, सुलभ प्रसुती, पौगंडावस्थेतील ताण, बुद्धिमत्ता, एकाग्रता,स्मरणशक्ती, विधायक विचारसरणी इ. साठी योगशास्त्राचा काय उपयोग होउ शकतो यावर संशोधन केले. समुपदेशन, व्यक्तिमत्व विकासपर कार्यशाळा, मार्गदर्शन केलं,. थेरपिस्ट नव्हे तर सायकोथेरपिस्ट म्हणून त्या आज काम करताहेत. त्यांचा स्वत:चा यापदापर्यंत पोहोचण्याचा प्रवास आपल्याला थक्क करून टाकतो. खरं सांगायचं तर त्यावर मी काही लिहिण्या इतकं मलाच अजून ते पुरतं अ‍ॅसिम्युलेट झालेलं नाही; काहीतरी भव्य- दिव्य पण अजून समजून घेतलं; पाहिजे अशी काहीशी अवस्था - हा लेख तीनदा वाचूनही - माझी झालीय. बहुदा त्यांना भेटल्यावरच काही स्प्ष्ट होउ शकेल. खरं तर ही मुलाखत शब्द बद्ध करणं अतिशय अवघड गोष्ट ! पण शुभदाताईंनी फार सुरेख पद्धतीने ती पेललय. वाचणार्‍याला स्वतःच्या आत डोकावायला त्या लावतात. रूतुजा ताईंची ही सगळी जडणघडण आपल्या आत त्या झिरपत नेतात. पण मला वाटतं हे क्षेत्रच अजून खुप गूढ आणि सर्वसामान्यांपासून खुप दूर आहे, म्हणूनच ते आपल्याला पूर्ण उलगडत नाही. किंवा माझी तेव्हढी प्रगल्भता नसेल. पण ते मनाला भावतं, भूरळ घालतं एव्हढं नक्की !
९. 'असावे घर अपुले छान' म्हणणार्‍या शोभा भोपटकर ! लँडस्केप आर्टिस्ट या वेगळ्याच वाटेवर अतिशय आत्मविश्वासाने चालणारी ही एक मैत्रिण ! वेगवेगळी आव्हानं पेलत, वेगवेगळ्या कल्पना साकारत तिनं आज मोठं यश मिळवलय. 'शोभा भोपटकर असोसिएटस' उभी केली. प्रत्यक्ष साईटवर थंडीवार्‍यात, पाऊसपाण्यात, उन्हातान्हात प्रत्यक्ष घाम गाळुन हे यश तिनं मिळवलय.
१०. 'गोवा टू बॉम्बे' भरारी मारलेली दिपा अवचट ! एक टेबलटेनिस पटू, गॅझेटेड कस्टम ऑफिसर, ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस आणि रेव्हेन्यु डिपार्टमेंटचे गोल्ड मेडल मिळवलेली दिपा अन एम्.डी. (सायकिअ‍ॅट्री), मॉडेल, अ‍ॅक्टर, पत्रकार, होमगार्ड ऑफिसर असलेले डॉ. सुहास अवचट हे एकमेकांना भेटले, अन त्यातून एक वेगळच विश्व निर्माण झालं- 'गोवा पोर्तुगीज' आणि 'कल्चर करी' ! गोवन चवीची ही रेस्टोरंट्स त्यांनी सुरू केली. पदार्थांची ऑथेंटीक चव आणि इंटटिरिअर यासाठी ही रेस्टॉरंट्स प्रसिद्ध आहेत. यांच्या उभारणीची कथा या लेखात आपल्याला वाचता येईल.
११.'जगमैत्रिण' तनुजा बांदिवडेकर !
स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमधली कन्सल्टंट आणि रिझवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये या शाखेची हेड ऑफ डिपार्टमेंट असलेली तनुजा, खरी ओळखली जाते ती बिल्डर आणि त्यांच्या कन्सल्टंटना पुरुन उरणारी कन्सलटंट म्हणून ! स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये एम. ई. तिनं केलय. अनेक मोठ्या नैसर्गिक आपत्तींना तोड देण्या योग्य इमारती कशा बांधता येतील हा तिच्या आवडीचा विषय !
'तनुजाला या अशा मेगा प्रॉजेक्टची जशी भीती वाटत नाही तशीच २५ माणसांच्या स्वयंपाकाचीही वाटत नाही.' एकीकडे सर्व सांसारिक जबाबदार्‍या पार पाडत , अगदी वेळप्रसंगी आपल्या करियरमध्ये ब्रेक घेऊनही तिने आपले करियर पूर्ण थांबवले नाही. जेव्हा जमवता आले तेव्हा पुन्हा आपली करियर सुरू केली. आज अनेक मोठ मोठी प्रोजेक्टस ती पूर्ण करतेय. जोडीने आपले पीएच. डी. ही पूर्ण करतेय. तिची ही सर्व वाटचाल नव्या पिढीतील तरूण मुलींना नक्कीच प्रेरणादायक ठरेल.
१२.'व्यवसायाला कल्पनांचे पंख' देणारी मंजिरी चुनेकर !
'उद्योगाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नाही, उद्योगासाठी आवश्यक ते पैशाचे पाठबळ नाही, त्या क्षेत्रातले शिक्षण नाही, की गाठीशी काही अनुभवही नाही; अशा परिस्थितीत ज्यांनी आपल्या उद्योगाचा पाया घातला, तो रुजवला, फुलवला, आणि नावारुपाला आणला, अशा काही मराठी उद्योजकांमध्ये' मंजिरी चुनेकरचा समावेश करता येईल. वयाच्या सत्तावीसाव्या वर्षा पर्यंत सर्वसामान्य आयुष्य गेलेल्या मंजिरीने आपल्या कर्तृत्वावर 'डायना मायक्रो, मायक्रोमेड आणि डॉन व्हिटले अशा तीन कंपन्या आज उभ्या केल्या आहेत.
बँकेकडून लोन मिळवणे, 'मिडिया' जो बॅक्टेरिया करण्यासाठी आवश्यक असतो तो तयार करणे, व्यवसायासाठी जागा मिळवणे, मार्केटिंग करणे, अशा अनेकविध अडचणींना तोंड देत देत मंजिरी खंबीरपणे उभी राहिली. तिची ही वाटचाल नव्या व्यवसाईकांना नक्कीच उदबोधक ठरेल.
(पुढे चालू ...)

No comments:

Post a Comment