Thursday, June 6, 2013

तीस मुलांची आई

(ह्यातील सर्वांचे मी नामकरण केले आहे. शक्यता आहे काहींची मूळ नावे वेगळी असतील. पण मी त्यांना ह्याच नावांनी हाका मारते.)

 माझी पहिली मुलगी अर्थातच तुलसी. सर्वच मराठी घरात पहिली येते ती हीच. घरातले वातावरण स्वच्छ करणारी, संध्याकाळी घर उजळवणा-या दिव्याला सामावून घेणारी, पहाटे हिलाच वंदन करून सुर्याचे दर्शन घ्यावे अशी ही तुळस.

नंतर आला तो पाश्चात्य मनी. घरात सुबत्ता आणण्याचा दावा करणारा. आपल्या सतेज रंगाने नेहमी घरात उत्साही राहणारा मनी प्लॅट.

तिस-या क्रमांकावर होत्या त्या जुळ्या बहिणी. सुरुवातीला एकाचीच चाहूल होती पण पाठ्ला पाठ लावून आल्या या दोघी निशा आणि राणी. माझ्या लाडक्या लेकी. दिवसभर त्यांच्या लांबलचक हिरव्या उत्साहाने सारा दिवस कसा प्रफुल्लित होऊन जातो अन रात्री सुगंधाने मोहवून टाकतात दोघी; सारे घर रात्र भर सुंगंधीत करून टाकणा-या दोन रातराण्या.

सध्या झोपाळ्यावर विसावलेली मधु या दोघींच्या नंतरची. लांब लचक देठांवर घोसच्या घोस घेऊन ओथंबलेली. थोडा गोड, थोडा रासवट मंद सुगंध बरसत वा-याच्या झोक्यावर मंद मंद झोके घेणारी मधुमालती.

अन मग चाहूल लागली पुन्हा जुळ्यांची. याही वेळेस गोंडस लेकी. पिली आणि गुली. लांबच लांब हिरव्या गवतातल्या या दोघी फार फार नाजुक. सुगंध नाहीच पण त्याची भरपाई रुपात. अलवार, तलम, मऊ कांती अन छोट्या झुळुकीवर डोलणा-या. पिवळ्या अन गुलाबी रंगात आपल्याला नाहून टाकणा-या लिली.

मग आली ती भारदस्त पर्णी. तिच्या गडद रंगाने आणि भरदार पणाने आकर्षून घेतले तिने. जाड, गडद हिरवी,  गोलाकार, पसरलेल्या तिच्या हातांनी जणूकाही घट्ट मिठ्ठीच मारत असते आपल्याला ती. इतरांच्या तुलनेत भरभक्कम अन भराभर वाढली ही. पण मग तिच्या वाढीला आवर घालावा लागलाच मला.तिला पिटुकले करताना फार काळजी घ्यावी लागली, तिला जगवण्यासाठी भारी कष्ट घ्यायला लागले. आता तिचे छोटे रुप माझ्या आवाक्यातले. माझ्या घराची शोभा वाढवणारी ही इटुकली पिटुकली सातपर्णी.

आमच्या शेजारी राहणा-या छोट्या रामला 'ते' फार त्रास द्यायचे. अगदी त्याचे जिवन असहाय्य करून सोडले 'त्यांनी'. माझ्या निगुतीने वाढणा-या मुलांकडे पाहून मग आमच्या शेजा-यांनी त्यांचा राम मला दत्तक दिला. अन तोही माझ्या गोकुळात सामावून गेला. तुलसीचा हा लांबचा भाऊ म्हणून मह त्या दोघांची गट्टी जमली. आपल्या वासाने आणि चवीने सुगंधीत करणारा हा राम - राम तुळस आता माझाच बनलाय.

मग आली ती झिपरी. सदा उत्साही. छोट्या छोट्या तिच्या झिप-या भुरळ घालणा-या. वेळ, काळ, ऋतु कोणताही असू दे, ही सदा आनंदी अन उत्साही. पाहता क्षणी आपल्या चेह-यावर हसू आणणारी झिपरी.

अन मग एका अपघाताने जन्माला आला तो काटेरी गोंडूस. घरातला ओला कचरा जिरवताना बहुदा याची बी रुजली. आधी कळलेच नाही त्यामुळे त्याचे नामकरण जरा उशीराच झाले. गडद रंग, गोलसर हात अन गोंडुस रासवट सुवासावरून त्याची निश्चिती झाली. अन मद त्याचा काट्यांनी ती नक्की केली. खरे तर हा फार फार भारदस्त. पण त्याला मी वाढवायचे तर पुन्हा पर्णी सारखीच त्याची जोपासना करणे क्रमप्राप्त होते. अजून संस्कार चालूच आहेत. बघू कसा वाढतोय हा काटेरी,गोंडुस मोसंबी.

तश्या या दोघी इतरांच्या घरात पटकन येतात. पण माझ्याकडे या जरा उशीरा आल्या. अन आल्या त्या एकदम, एकमेकींच्या हातात हात घालून. लाली अन गुलाबी. सदा आपल्या उत्साही, रंगीत. एकाच वेळि ३-३, ४-४ फुलांनी फुललेल्या लाल अन गुलाबी सदाफुली.

तसाच राजाही जरा उशीरा आला. त्याचे गावठीपणच मला भावले. गडद लालेलाल अन सुगंधी लाल गुलाब जणु राजाच माझ्या घरचा.

माझी दुसरी दत्तक मुलगी म्हनजे शेवंता.शेजारच्या इमारतीतील एका आज्जींना आता सारे करणे झेपेना. हळू हळु त्यांनी एकेक पसारा आवरायला घेतला. त्यात ही माझ्याकडे दत्तक म्हणुन आली. आली तेव्हा इतकुली असणारी आता छान वाढली, आता फुलेल लवकरच ही शेवंती.

आमच्या सोसायटीतल्या एकाला एके ठिकाणी ही छोटी सापडली. कोणीतरी बेवारशी सोडलेली. त्याला कळवळा आला अन तिला तो माझ्याकडे घेऊन आला. तिची अवस्था अतिशय नाजूक होती. अगदी खुरटलेली, अंगात जीव नसलेली, मरणप्राय अवस्थेतील या छोटीला अगदी सांभाळून वाढवली. अगदी लवंग उष्ण लागेल अन वेलचीने सर्दी होईल अशी तोळा मासा प्रकृती हिची. पण हळूहळू तग धरली हिने. अन आता मस्त डोलते आपला रंगीत भार पेलून.

मध्यंतरी माझ्या दोघी लेकीचा पसारा फार वाढला. मग काही काटछाट करताना मनात आले की पर्णी अन गोंडुस यांच्या सोबत छोटी मधू अन छोटी राणि करावी का? मग त्यांन जन्माला घातले. आताशी त्या दोघी जीव धरू लागल्यात. त्यांचे छोटे होणे कसे जमतेय ते बघू पुढे. पण मोठ्या निशा न राणी या दोघींचे आपल्या या छोटुकल्या राणीकडे लक्ष आहे अन झोपाळ्यावर विसावलेल्या मधूचे आपल्या पिटुकल्या मधू कडे लक्ष आहेच त्यामुळे मला काळजी नाही य पिटुकल्या दोघींची.

मोठ्या प्रेमाने आणि खूप अपेक्षा घेऊन जन्माला आला तो सुगंध. सुरेख वाढला. पण काही केल्या त्याचे मन माझ्याकडे लागले नाही. मनासारखा उमललाच नाही तो. दोन वर्षे त्याच्याशी खूप बोलले, त्याचे खुप लाड केले पण नाहीच फुलला मोगरा.
मग त्याच्या सोबत म्हणून अजून एक सुगंध आणला. हा मात्र लगेच फुलला. सुगंधी मोग-याच्या सोबत बघू पुढच्या उन्हाळ्यात तरी मोगरा फुलतो का.

माझ्या स्वयंपाक घरात माझ्या पदराशी लोंबकळणारा हा सुरुवातीला फार नाजूक होता. तशात कोवळ्या वयात तो व्यायला. त्याच्या फुलांकडे पाहून कॉलनीच्या माळ्याने आता हा वाढणार नाही असे दुष्ट भविष्य वर्तवले. मी मनातून भारी हिरमुसले. पण मग भविष्य हे घडवायचे असते यावर विश्वास ठेऊन त्याच्याशी बोलत राहिले. इथल्या मित्र मैत्रिणींच्या सल्ल्याने त्याचा बहर खुडून टाकला. त्याला समजावले बाळा तुझे वय वाढीचे, बहरण्याचे नाही. अजून त्याला वेळ आहे. त्याला पुन्हा पुन्हा बहर येत होता. अन मी त्याला खुडून टाकत समजावत राहिले. नाठाळ मुला प्रमाणे त्याने माझा फार फार पेशन्स पाहिला. पण अखेर ताकाचा शुद्ध आहार अन माझ्या  संस्कारांनी तो शमला. त्याचे उधळले पण निवाले. अन आता गुमाने नीट वाढतोय कढीलिंब.

गोंडुसच्या जन्माने मला शिकवले की काहीही वाया जात नाही. अगदी कच-यातूनही काही जन्मते. मग मी कचराही जिरवायला लागले. त्यातून ही जन्मली. जन्मली तेव्हा कळले नाहीच हिचेही नाव गाव. पण मग एके दिवशी एका हाताखाली नाजूक पांढरे-काळे फुल घेऊन आली. अन मग माझी ट्युब पेटली. त्या फुला कडे त्याच्या नाजूक, अलवार रुपाकडे पाहून कोणाला खरे वाटणार नाही, की यातूनच बनते तिखट मिरची. एकदम झणझणीत आहे माझी मिरची.

बहिणी कडच्या ह्याने मला भुरळ घातली होती. त्याचा सुवास, त्याचे शुभ्र गोजिरे रुपडे मनाला भावून गेले होते. मग तोही आणला घरी. पटकन रुळला तो. अन मग पहाटे माझ्या घरी चांदणे उमलवतो हा कुंद !

एके दिवशी याला पाहिले अन त्याच्या प्रेमातच पडले. मग काय त्याला घरी घेऊन आले. अतिशिय आटोपशीर पणे पसरलेला, वा-याच्या झुळुकेवर झुलणारा, पाखरांच्य घरट्यांना लांब सडक दो-या पुरवणारा माझा लाडका पाम. त्याच्यामुळेच तर लालबुड्या माझ्या दारी येत असतो.

माझ्या दारी सन बर्ड आला तो याच्या मुळे. खरे तर कुंपणावर पडिक असणारा हा. लहान पणापासून माझ्या मनात भरला होता. मग काय घेऊन आले त्यालाही. सुरेख पाच बोटांचे इवलाले हात पसरून तो वाढू लागला. आजूबाजूला जे कोणी असेल त्याला आपल्या नाजूक पण बळकट हातांनी वेढून घेऊ लागला. त्याचा पसारा हळूहळू बाढू लागला. अन मग एके दिवशी सकाळि घरात दरवळ पसरला. रानवट पण अतिशय गोड वास सर्वांना खेचून घेऊ लागला. माझ्या दारी चक्क निळा जांभळा कृष्ण अवतला. अन त्याच्या पाठोपाठ सनबर्डही अवतलला. कृष्णकमळाच्या फुलावर उलटा टिंगून लटकणारा सनबर्ड बघताना काय वाटते ते कसे वर्णन करू ?

थोडी मोठी मुलंही रुळतात हे पाहून याचे कंद आणले. छोटे दोन हात उचलून तो माझ्याकडे बघू लागला आणि मला कलले हाही जन्माला येतोय. अन मग एके दिवशी हळूच आपले फुगलेले पोट त्याने दाखवले. आठवड्यातच एका संध्याकाळी अंधारून यायला अन सोनटक्क्याच्या फुलांनी उमलायला एकच वेळ आली. शुभ्र काही उमलले, सुगंधी काही पसरले, डोळे, मन अगदी निमाले.

हा माझा प्रचंड आवडीचा पण माझ्या छोट्या घरात हा कसा वाढेल अशी शंका होती मनात. पण जेव्हा गोंडुसही माझ्याकडे आपण हून वाढला तेव्हा धाडस करायचे ठरवले. अन त्याला घरी आणले.  मोठ्या बालदी मध्ये त्याला स्थानापन्न केले. आणले तेव्हा ब-याच कळ्या होत्या त्याला. त्या तर उमलल्या. पण तो रुजला की नाही ते कळायला अजून वेळ होता. होत्या त्या कळ्या सा-या उमलून गेल्या. अन मग कोवळी पाने नव्याने आली. अन चक्क एक नवी कळीही आलीय. आता नक्कीच माझा चाफा रुजलाय.

मग माझ्या मैत्रिण कम विद्यार्थिनीने तिची तीन बाळे मला भेट दिली. नाजुका, जांभळी अन मखमली. आता त्यांना माझ्या दारी रुजवतेय.

या सा-यांना वेळोवेळी तुम्ही पाहिलं आहेच इथे, त्यामुळे पुन्हा फोटो नाही टाकत त्यांचे. या सा-या मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी नुकताच आई आणि बहिणींनी झोपाळा दिलाय. मग काय येताय ना माझ्या ३० मुलांशी गप्पा मरायला? मुलं आणि झोपाळा वाट बघताहेत :)3 comments:

  1. Itakya mulaanna sambhalayache mhanaje changalich kasoti!! Tumacha pahila number aalay!!!

    ReplyDelete
  2. अंजली मावशी थांकु :)
    मंदार, धन्यवाद !

    ReplyDelete