Thursday, December 20, 2012

वत्सल सुधा : पूर्वार्ध

माझी आजी, माझ्या आईची सावत्र आई म्हणजे सौ. सुधा प्रधान ( पूर्वाश्रमाची वत्सला गुप्ते) हिची कथा मी लहानपणापासून आईकडून ऐकत आले. तिच्या आयुष्यातल्या अनेक घटन सर्वसामान्य स्त्री पेक्षा खूप वेगळ्या. त्या सगळ्यांसमोर मांडाव्या वाटल्या. म्हणून हे लिखाण. यातल्या महत्वाच्या ठळक घटना जशाच्या तशा मांडल्या आहेत. माझी आई, मोठा मामा यांनी त्या आपल्या आठवणींतून सांगितल्या आहेत. १९४८ मध्ये स्त्री मासिकासाठी तिची मुलाखत श्री. दि. बा. मोकाशी यांनी घेतली होती. ऑगस्ट १९४८ च्या स्त्री मासिकात ती छापून आली होती. त्या काळातले एक वेगळे व्यक्तित्व आणि एक फार वेगळे आयुष्य जगलेली ही एक कर्तबगार, कणखर अन वेगळीच स्त्री.
१९१५ साल असावे, वत्सलाचा जन्म कर्जतच्या गुप्त्यांच्या घरी झाला. मातृसुख तिला फार लाभले नाही. लहानपणीच तिची आई गेली. वत्सला दिसायला अतिशय सुरेख होती, घरी सावत्र आई आलेली त्यामुळे अन त्या काळातल्या पद्धतीने तिचे वयाच्या अकराव्या वर्षीच लग्न झाले. लग्न झाल्यावर सासरी, दहिवली या गावी ती गेली. इथपर्यंतचे तिचे आयुष्य त्या काळातल्या सर्वसामान्य मुलीचेच होते.
तिच्या आयुष्याला इथेच कलाटणी मिळाली.
सासरी गेल्यावर अकरा वर्षाच्या वत्सलाला तिथले वातावरण बरोबर वाटले नाही. तिथे राहणे, संसार करणे आपल्याला धोकादायक होईल हे लक्षात आल्या बरोब्बर आठव्या दिवशीच ही अकरा वर्षाची मुलगी तडक माहेरी परत आली. तिने सासरची परिस्थिती घरच्यांना सांगितली. इतर नातेवाईकांनी तिच्यावर परत सासरी जाण्याचे दडपण आणण्याचा प्रयत्न केला परंतु वडिल अन मोठे भाऊही तिच्या पाठीशी ठाम उभे राहिले. तिच्या सासरी परत न जाण्याच्या निर्णयाला त्यांनी मान्यता दिली. खंबीरपणे त्यांनी तिला आधार दिला.
लग्न होई पर्यंत वत्सला फक्त चवथी पास होती. ती परत आल्यावर काही काळ या सर्व धक्क्यातून सावरावयात गेला. समाजाचा विरोध, वाईट नजरा, काही प्रमाणात बोलणी या सर्वांतून वत्सला तावून सुलाखून निघाली. परंतु ती तिच्या मताशी ठाम होती.
सतरा वर्षाची होई पर्यंत काळ असाच गेला. वत्सलाला आपण स्वतःच्या पायावर उभी राहावे असे वाटत होते. त्यामुळे तिने पुढे शिकण्याचे ठरवले. मोठे भाऊ, वहिनी अगदी प्रेमाने वागवत असले तरी तिच्या स्वाभिमानी वृत्तीला नुसते बसून राहणे पटत नव्हते. म्हणुन मग तिने शिकवण्याचे ठरवले. परंतु मध्ये बरीच वर्षे अशीच गेली होती. केवळ तीन महिन्याच्या अभ्यासावर तिने चौथीची परीक्षा दिली अन त्यात पहिला नंबर मिळवला. पुढे ती फायनल पर्यंत शिकली. अन लगेचच शिक्षिका म्हणून नोकरीला लागली. त्या नंतर तिने टिचर्स ट्रेनिंग कोर्स नाशिक येथे केला. त्या सुमारास सौ. सुधाताई अत्रे (प्र. के. अत्रे यांच्या पत्नी ) तिथे मेट्रन होत्या. त्यांना वत्सलाचे भारी कौतुक होते. त्यांच्याकडे नॉनव्हेज केले की त्या आवर्जून वत्सलाला जेवायला बोलवत. टिचर्स ट्रेनिंग झाल्यानंतर लगेचच वत्सला कर्जतच्या शाळेत शिक्षिका म्हणून शिकवायला लागली.
काही वर्षांनी वत्सलाला ठाण्याला शिक्षिकेची नोकरी मिळाली. तिचे काका ठाण्याला वकील होते. त्यांच्याकडे राहून तिने आपली ठाण्यातली शिक्षिकेची नोकरी सुरू ठेवली.
कालांतराने तिचे वडिलही गेले. धाकट्या भावंडांची जबाबदारी तिने उचलली. त्यांची शिक्षणे, लग्न तिने लाऊन दिली. नंतर ती मुलुंडच्या शाळेत नोकरीला लागली. तिथे वर चढत चढत हेड मिस्ट्रेस झाली.
१९४७च्या सुमारास ठाण्यातील रेव्हेन्यु खात्यातील डि. वाय. प्रधान यांच्या प्रथम पत्नीचे अकाली अन अचानक निधन झाले. १३, ११, ९, ६, ४ अशा वयातली पाच लहान मुले आई विना पोरकी झाली. डि. वाय यांचा स्वभाव अतिशय कडक होता. त्यामुळे या लहान लहान मुलांना आता कोण आई म्हणुन लाभेल असा विचार वत्सलाबाईंच्या मनात आला. आपल्या काकींजवळ त्यांनी हे बोलून दाखवले. तेव्हा तूच का करत नाहीस असे काकींनी विचारले. काकींनी पुढाकार घेतला अन डि. वाय. प्रधान आणि वत्सलाबाई यांची गाठ त्यांनी घालून दिली.
प्रधानांनी आपले कुटुंबनियोजनाचे ऑपरेशन झाले आहे तेव्हा तुम्हाला स्वतःचे मूल होणार नाही अन या पाचही मुलांची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल असे सांगितले. तसेच प्रथम पत्नीची आई अन प्रधानांचे वयस्कर वडिल हेही आपल्याच घरी राहतील याचीही कल्पना दिली. प्रधानांनी इतक्या स्पष्टपणे सर्व सांगितले त्यावरून त्यांच्या स्वच्छ मनाची कल्पना वत्सलाबाईंना आली. तसेच प्रधानांबद्दल समाजात तेव्हा फार चांगले मत होते. अतिशय सचोटीची व्यक्ती म्हणुन ते आदराने ओळखले जात. त्यात या पाच मुलांचा विचार करून वत्सलाबाईंनी लग्नाचा निर्णय घेतला.
परंतु या लग्नात एक अडचण होती. ती म्हणजे वत्सला बाईंचे आधीचे लग्न. जरी त्या सासरी फार राहिल्या नसल्या तरी लग्न झाले होते. या सुमारास नुकताच मुंबईच्या विधी मंडळात घटस्फोटाचा कायदा संमत झाला होता. त्यामुळे जो पर्यंत घटस्फोट होत नाही तो पर्यंत दुसरे लग्न मी करणार नाही असा विचार प्रधानांनी मांडला. नियम, कायदे यांना अतिशय महत्व देणारे गृहस्थ असल्याने प्रधानांचा हा विचार रास्तच होता. ठाण्याचे त्या वेळचे प्रसिद्ध वकील मा. माधवराव हेगडे यांनी वत्सलाबाईंची केस घेतली. मुख्य प्रश्न होता तो आधीच्या नव-याला शोधून त्याची घटस्फोटासाठी सही घेण्याचा. वत्सला सासर सोडून आल्या नंतर वर्षभरात त्या व्यक्तीने दुसरे लग्न केले होते. अन त्या नंतर दोन वर्षांनी ती व्यक्ती परागंदा झाली होती. त्या मुळे त्या व्यक्तीला शोधणे अन त्यांच्याकडून घटस्फोटाच्या अर्जावर सही घेणे ही एक अवघड बाब झाली होती. हे काम माधवराव हेगडे यांनी चोख केले. या सर्व खटल्याचे काम मा. श्री माधवराव हेगडे यांनी काहीही मानधन न घेता केले, हे विषेश! त्या प्रथम पतीनेही कोणतीही खळखळ न करता सही दिली. अन घटस्फोट पार पडला.
जानेवारी १९४८ मध्ये वत्सलाबाई यांचे डि. वाय. प्रधान यांच्याशी दुसरे लग्न झाले. अन त्या सौ. सुधा दत्तात्रय प्रधान बनल्या. त्या वेळच्या "लोकमान्य" या वृत्तपत्रात " एका घटस्फोटित महिलेचा दुसरा विवाह संपन्न" अशी बातमी पहिल्या पानावर झळकली होती. असा रितीने सुधाबाईंचा संसार सुरू झाला.
( पुढे चालू....)

Bai_1 copy.jpg

6 comments:

 1. Wowwww me kadhi vicharach kela navta ki aplya itihasaat ashya goshti ghadun gelya asatil. Mala khupach avadel pudhe kay jhale te vachayla. Please post next part.

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद विद्या :) लवकरच लिहिते.

   Delete
 2. वाचत आहे. त्याकाळात घडलेल्या सत्यकथा त्या काळातील नीतिनियम ,सामाजिक परिभाषा व अनेक गोष्टींवर प्रकाशझोत टाकतील ह्यात शंका नाही.
  -Ninad Kulkarni

  ReplyDelete
 3. Very interesting story. It is unfortunate that in spite of leaving her first husband herself she is still mentioned as Parityakta in the newspaper.
  I king of get now where your fiery personality comes from. I guess your grandmother in your blood even though not literally :)

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद देवयानी :)
   अगं त्या काळात बहुदा दुसरा शब्द नसावा. १९४८ मध्ये हि कथा लोकांसमोर इतक्या डिग्निटीने आली हेही नसे थोडके, हो ना?
   अन मला तिला बघताही नाही आले :( ती १९६० ला गेली. माझा जन्म त्या नंतरचा. पण हो, आजीकडून आईकडे अन मग माझ्याकडे असा वारसा नक्की आला असेल संस्कारातून :) मनापासून धन्यवाद ग :)

   Delete