Wednesday, November 14, 2012

"हे छंद जिवाला लावी पिसे"

(निळ्या रंगातील शब्दांवर क्लिक केल्यास त्या त्या गोष्टी आपल्याला बघता येतील. )


छंदांविषयी लिहायचे म्हटले अन मनात सगळ्यांनी धक्काबुक्की सुरू केली. "ए मी आधी, नाहीरे तू नाही आधी मी..." अरे बापरे, या सर्वांना एका माळेत ओवू तरी कशी ? शेवटी ठरवले. लहानपणापासून लिहायला लागू. प्रत्येकाची अगदी साद्यंत नाही तरी निदान दखल तरी घेऊ. अन बसले लिहायला. कधी नुसतीच यादी झाली, कधी त्या छंदात हरवून जाऊ लागले. पण पुन्हा पुन्हा मनाला ओढून एका माळेत कोंबायचा प्रयत्न केला. तो तसाच मांडते तुमच्या समोर.

तर, अगदी लहानपणी खेळ हा माझा आवडता छंद होता. पत्ते, सागरगोटे, सापशिडी, ल्युडो, व्यापार यांसारखे बैठे तर कधी लगोरी, आट्यापाट्या, डब्बा ऐसपैस, लपाछपी, खोखो, लंगडी, रिंग टेनिस, बॅडमिंटन, कब्बड्डी, क्रिकेट असे मैदानी खेळ.

आणि चित्र काढणं. आई माझ्या लहानपणीची एक आठवण आवर्जून सांगते. मी ४-५ वर्षाची असेन, दुर्गापूजेला पाटीवर दुर्गेचे खुप छान चित्र काढलं होतं. तेव्हापासून चित्र काढायचा छंद चालू झाला तो आजपर्यंत.


कधी मूड नसला तर हातातली पेन्सिल, रंग एक नवाच मूड तयार करून देतात, अन मग मी नव्या उत्साहाने पुन्हा भिडते आयुष्याला  ;)

नंतर वाचनाचा छंद, छंद कसला वेडच ते. गोष्टी, कथा, कादंब-या, आत्मचरित्र सगळे सगळे आवडे मला. ते वेड तर आजपर्यंत तसेच लागलेले राहिले. याच वेडाने तर मला जगात जगायला शिकवलं. ज्या ज्या अनुभुतींनी मी चक्रावून गेले त्या त्या अनुभुतींमधून कोणी कसा कोणी कसा मार्ग काढला ते या पुस्तकांनी शिकवलं. तर अनोळखी अनेक वाटा त्यांनी दाखवल्या. कित्येक आनंदाचे क्षण त्यांनीच मला दिले. अन गोंधळलेल्या अवस्थेत हातही त्यांनी दिला मला.



मग हळूहळू विणकामाचा, शिवणकामाचा, भरतकामाचा छंद लागला. इतका की रात्र रात्र जागून अनेक फ्रेम्स, साड्या, पडदे भरले
 


बेट लावून ठराविक दिवसांत स्वेटर विणले.


मनातल्या अनेक वेड्यावाकड्या रेषांना वळण लावले या भरतकामाने अन आयुष्यातले कित्येक गुंत्यांना सोडवले या विणकामाच्या छंदाच्या सोबतीने.

याच वयात स्वयंपाकाचाही छंद वाढीस लागला. जास्ती करून नॉनव्हेज पदार्थ करण्यात रस असे. पारंपारिक पदार्थांपेक्षा काही तरी इनोव्हेटिव्ह करण्याकडे कल असे. माझ्या पिढीतल्या स्त्रियांना स्वयंपाकघर हा टप्पा अपरिहार्य होता. माझ्या नशीबाने त्याला छंदाचे रूप मिळाले अन एका अर्थाने या कंटाळवाण्या टप्प्याने मला आनंदच दिला. रोजच्या चपात्या लाटण्याच्या कामातही फुगलेल्या प्रत्येक चपातीने अन खमंग भाजलेल्या प्रत्येक चिकनच्या तंगडीने समाधन दिले.



मग नंतर माझ्या फार प्रेमाचा छंद आला तो म्हणजे लिहिण्याचा- कविता लिहिण्याचा. त्याने तर फार मोठा आधार दिला मला. माझ्या अन माझ्यासारख्या अनेक स्त्रियांच्या जीवनातल्या अनेक गोष्टी या छंदाने मला जास्त चांगल्या समजावल्या. माझ्या कविता जरा दुर्बोध ख-या. पण एखाद्या वाचकाने जरी त्यातली नेमकी भावना ओळखली तरी ती आनंद देऊन जाई.

अन मग वैचारिक लेखनाने माझ्यावर आपली भूल घातली. माझ्या व्यवसायाने माझी ही इच्छा पूर्ण केली. विद्यापीठातल्या अनेक विषयांच्या क्रमिक पुस्तकांच्या लिखाणातून माझा हाही छंद फोफावत गेला. त्यातून आमच्या विद्यापीठाने अनेक वेगळे विषय सादर केले होते, त्यातून या छंदाच्या कक्षा रुंदावत गेल्या. त्याशिवाय विद्यार्थ्यांसाठी दर वर्षी निघणारी मासिकं, इतिहास संशोधक मंडळाची मासिकं, जीवनशिक्षणची मासिकं यांतून अनेक विषयांवर लिखाण करायला संधी मिळतच गेली.

"यांनी घडवलं सहस्रक" या रोहन प्रकाशनाच्या अतिशय सुंदर पुस्तकातही काही लेख लिहिण्याची संधी मिळाली.


१५ वर्षांच्या प्राध्यापकीत शिकवण्याचा छंद आपोआपच पूर्ण होत गेला. त्यातून आमचे मुक्त विद्यापीठ असल्याने वेगवेगळ्या गावांमध्ये, शहरांमध्ये, वेगवेगळ्या वयाच्या, वेगवेगळ्या स्तरांतील विद्यार्थ्यांना शिकवायला मिळाले.( मी २४ वर्षाची तर समोरचा विद्यार्थी ७२ चा असं ही झालं.) अगदी येरवडा जेल मधल्या जन्मठेप झालेल्या विद्यार्थ्यांनाही.

त्यातून एक खुप वेगळा विषय ब-याचदा शिकवायला मिळाला. "संज्ञापन कौशल्य" ज्यात वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांना आपली मते निबंधातून मांडावयाची असत. स्वाभाविकच हा विषय शिकवताना खुप कस लागायचा. आपली माहिती, त्याची मांडणी, त्याची चर्चा, या सर्वांवर विद्यार्थ्यांशी संवाद, चर्चा अन त्यांच्या विचारांना योग्य दिशा देणे. यातून अनेक छंद जोपासले गेले. वाचन, बोलण्याची हौस, चर्चा, वादविवादाची हौस. जवळजवळ १५ वर्षे अनेक छंद असे पूर्ण होत राहिले. परंतु हे सगळे तसे वैचारिक स्वरुपाचे.
त्यातही वर्धापन दिनानिमित्ताने सादर केलेल्या कार्यक्रमाचे निवेदन, आमच्या सरांकडे आलेले कवितेच्या पुस्तकाचे परिक्षणाचे- त्यांनी माझ्यावर सोपवलेले काम अशा काही प्रसंगातून माझा साहित्याचा छंद थोडा जीव धरून होता. पण त्याला खरा वेळ मिळाला तो नोकरी सोडल्यावरच.

नोकरी सोडली ती माझ्या एका फार महत्वाच्या छंदासाठीच. माझा लेक. हा तर माझा सगळ्यात मोठा आनंदाचा छंद. त्याच्या वाढण्यात, त्याच्या सगळ्या कृतींमधून मिळणारा आनंद सर्व आनंदांच्या खुप खुप वरचा. त्यातून माझा लेक लहान असताना अगदी लाजराबुजरा. आईचा पदर धरून असणारा.


त्याला स्वतंत्र करण्याचा, त्याला स्वावलंबी बनवण्याचा अन त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा छंद दोन वर्षे पुरला. मग त्याची गरज राहिली नाही. कधी कधी माझा हा छंद आजही डोके वर काढतो. पण तो आपला माझ्या हौसेपोटी. लेक लगेचच तो छंद हाणून पाडतोच.

आता मला ब-यापैकी वेळ 'माझा' म्हणून मिळायला लागला. मग मी इतक्या वर्षात मागे पडलेल्या छंदाला हाक मारली. विणकाम, भरतकाम. त्याच सुमारास आर्टिफिशिअल ज्युवेलरीची फॅशन आली होती. मग काय दागिने बनवण्याचा छंद सुरू झाला. घरातल्या सगळ्या मुली, बायका, नातेवाईक, मैत्रिणी, ओळखीचे पाळखीचे सगळ्यांना त्यांच्या वाढदिवसाला हे दागिने जाऊन पोहोचले. प्रत्येकीच्या आवडीनुसार डिझाईन अन रंग गुंफता गुंफता मीच त्यात गुंगून गेले. अन या अनोख्या भेटींमुळे माझ्या सख्यांही खुष व्हायच्या.


अचानक चित्रकलेने डोके वर काढले. त्याचे असे झाले. आमच्या नव्या घरात हॉल अन टेरेसला जोडणारे एक काचेचे भले मोठे दार होते. काचही अतिशय पारदर्शक शिवाय मला ती फार स्वच्छ ठेवायला आवडायची. एकदा ते दार बंद असताना, लक्षात न आल्याने माझे बाबा त्यावर धाडकन आपटले. मग लक्षात आले की ही काच अशी स्वच्छ ठेवणे योग्य नाही. मग त्या काचेवर कलाकारी सुरू झाली. कधी झाडाला टेकून कृष्णाची वाट पाहणारी राधा


तर कधी नुसतीच फुलांची रंगसंगती,


तर कधी निसर्ग चित्र तर कधी मॉडर्न आर्ट. एक चित्र काढलं की किमान २ महिने टिकत असे. अन चित्र काढायला किमान आठवडा लागत असे. त्या घरात रहात असे पर्यंत हा छंद अनेक दुपारींना पुरला.

याच सुमारास आई बाबांच्या लग्नाच्या ५०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या दोघांच्यावरती एक एक फिल्म तयार केल्या. तो पर्यंत तसे कसलेच फॉर्मल शिक्षण नव्हते. तरी एक छंद म्हणुन सर्व घरच्यांनी त्या फिल्म्सचे कौतुकच केले.

ते घर आम्ही सोडले अन कोथरूडमध्ये आलो. पण चित्रकलेचा छंद माझा हात सोडेना. त्यात आईबाबांच्या फिल्म करता आल्यामुळे मनात एक नवाच विचार सुरू झाला. मुलांना इतिहास आवडीचा कसा करता येईल असा तो विचार. अन त्यातून अ‍ॅनिमेशनचा नवा छंद समोर आला. अन या छंदाने मला पुरते व्यापून टाकले. किती शिकू अन किती नको असे झाले. चित्रकला अन कल्पनाशक्ती यांना पुरून उरणारा हा छंद. यातूनच मूर्तीकला शिकले, चित्रकलेचे शास्त्र, अ‍ॅनिमेशनची अनेक सॉफ्टवेअर्स, एडिटिंग असे कितीतरी नवे, या छंदाने शिकवले. फोटोशॉपमधे पेंटींग करून भाच्याला लग्नाचे प्रेझेंट देताना खुप आनंद झाला.



माझ्या आईची आई खुप आधी गेली. तिचा पूर्ण फोटोही उपलब्ध नव्हता. एका गृप फोटोतला तिचा चेहरा, आणि आई कडून तिच्याबद्दल जे एकले होते त्यावरून तिचे पूर्णचित्र काढले अन आईला वाढदिवसाला दिले.


तिच्या डोळ्यातल्या आनंदाश्रूंनी माझ्या या छंदाचे चीज झाल्यासारखे वाटले.
या जोडीने म्युरल्स बनवण्याचाही छंद लगे हाथ पूर्ण करून घेतला.



















काही अ‍ॅनिमेशन्स बनवली. पृथ्वीचे पाणिग्रहण ही कविता, मायबोलीच्या शिर्षक गीताचे   " टिझर " , इतर काही छोट्या छोट्या फिती.

याच सुमारास एका वाढदिवसाला नव-याने माझी खुप वर्षांची इछा पूर्ण केली. आमचा कॅनन ४० डी आला. मग काय तो माझ्या नव्या छंदाचा साथीदार झाला. योगायोगाने त्याच सुमारास लेकाची १० झाली अन आम्हाला जंगलात जाण्याच्या संधाही मिळाल्या. वाईल्ड लाईफ हा अजून एक जिव्हाळ्याचा छंद. आज पर्यंत चार वेळा जाऊन आले पण प्रत्येक वेळेस तहान वाढत जातेय. एरवी मनुष्य प्राणी सोडता बाकीच्या सर्व प्राण्यांना घाबरणारी मी, वाघाची मात्र जुनी ओळख असल्यासारखी मनाने जवळ गेले. तोही बापडा प्रत्येक वेळेस मनापासून भेटला. जोडीने पक्षांनीही साद घातली पण तो छंद नाही होऊ शकला. जंगलाने अन फोटोग्राफीने मात्र माझा ताबा घेतला.


आता सर्वात महत्वाचा असा छंद ! ज्याने माझ्या आयुष्यातला खुप मोठा, खुप आनंदाचा भाग व्यापलाय, हो अगदी व्यापलाय. तो छंद म्हणजे "मायबोली" ! आज जवळजवळ चार वर्षे होत आली, या छंदाने माझे किमान १/३ आयुष्य व्यापून टाकलय. (मायबोलीवर मी "अवल" नावाने लिहिते. )  इथे आले ती भीत भीतच. ना कॉम्प्युटरचा सराव होता, ना नेटचा सराव होता, ना सोशल नेटवर्किंगचा, ना ललित काही लिहायचा. कविता जरूर करत होते, पण खरं सांगते माझ्या कविता इथे येई पर्यंत मोजून चार जणांनीच वाचल्या होत्या, त्याही काहीच. त्या मुळे हे सगळे मला फार फार नवीन होते. माझ्या हातात एकाच वेळेस दोन अद्भूत दालनं मला खुली झाली होती. एक अ‍ॅनिमेशनचं अन दुसरं मायबोलीचं. या दोन्हींनी मला खुप काही दिलं.

त्यातही मायबोलीने मला एक आत्मविश्वास दिला. अभ्यासाच्या क्षेत्रात काही प्रश्न नव्हता आत्मविश्वासाचा. परंतु माझ्या कलेला इथे जी दाद मिळाली ती खरोखर मला अपेक्षित नव्हती. खरं तर माझा कलेतला प्रवास अन मायबोलीवरचा प्रवास एकाच वेळेस सुरू झाला. त्यामुळे माझ्यातली कला व्यक्त होण्याची सगळी इथेच झाली. अन वेळोवेळी अनेक मायबोलीकरांनी मला, माझ्या कलेला आपल्या कौतुकाने न्हाहू घातले. माझ्या कविता, माझे इतर लिखाण, कला, माझी बांधवगडचे व्याघ्रदर्शन ही लेखमाला, हे सारे प्रथम इथे आले. अनेकदा तर माझ्या घरच्या कोणी बघण्या-वाचण्या आधी मायबोलीकरांनी माझे वाचले. माझ्या सासरी साहित्याची फारशी आवड नाही. माहेरी आई, मावशी, मामा अन बहिणी सोडता बाकीच्यांनाही साहित्याची फार आवड नाही. पण इथे माझ्या सगळ्या भाऊ-बहिणींनी माझे लिखाण प्रेमाने वाचले. हा छंद त्यांच्या या प्रेमातून वाढीस लागला. या सर्वांच्या ऋणात राहणेच मी पसंत करते. माझ्यासारखाच तुमचाही हा मायबोलीचा छंद असाच दिवसेंदिवस वाढत राहो.

मायबोलीने आणखीन आणखीन एक छंद पुरवला, तो म्हणजे अ‍ॅनिमेशनचा. जरी शिकले असले तरी प्रत्यक्ष अ‍ॅनिमेशन करण्याची तशी संधी मिळाली नव्हती. पण मायबोलीच्या शीर्षकगीताच्या टिझरच्या कामात संधी मिळाली. ते दिवस अक्षरशः मंतरल्यासारखे होते. रात्रंदिन तोच ध्यास होता. सरस्वतीचे अ‍ॅनिमेशन करताना लहानपणी शाळेत गिरवलेली सरस्वती पुन्हा एकदा गिरवली. याबद्दल तुम्ही इथे वाचले आहेच.

तर त्या नंतर छंद लागला तो ब्लॉगचा. त्याला कारण झाला माझा भाचा. "माई (मला सगळी भाचेकंपनी मावशी न म्हणता माई म्हणतात) एव्हढं सगळं करतेस तर तू ब्लॉग का तयार करत नाहीस तुझा? " असा प्रश्न त्याने विचारला. मग काय एक नवेच खेळणे मिळाले. खरं तर तंत्रज्ञान म्हटले की मी अंगुठाछाप बनते. लेक तर ओरडतोच, "इलेक्ट्रॉनिक्स मधला इ दिसला की तू अशी काय ढ होतेस? "

त्यामुळे हे ब्लॉग प्रकरण आपल्याला जमेल असे अजिबात वाटले नव्हते. तो पर्यंत ब्लॉग प्रकरण म्हणजे काय हे ही माहिती नव्हते. कोणाचा ब्लॉग असतो म्हणजे काय हेच माहिती नव्हते. त्यातून नेट बद्दल प्रचंड दडस होती. अगदी मोजक्या साईटस मी बघायची. त्यामुळे ब्लॉग हे प्रकरण छंद वगैरे न वाटता एक मोठं दडपणच वाटत होतं. खरं तर फोटोग्राफी करताना फ्लिकरवर एका प्रॉजेक्टमधून एक फोटोग्राफीचा ब्लॉग मोफत मिळाला होता. पण तेव्हा त्याकडे भितीने ढुंकूनही बघितले नव्हते. पण लेकानेही भरीस घातले. मग म्हटलं बघू तरी.

अन हळूहळू त्याची नशा चढत गेली. माझा ब्लॉग तयार झाला. मग माझ्या भाच्याने, " आता तू आजीचा ब्लॉग तयार कर" अशी प्रेमळ सूचना केली. मग झालं,   आईचा ब्लॉग तयार केला. मग बहिणीच्या म्हणण्यानुसार बाबांचा का नको म्हणून   बाबांचा ब्लॉग केला.

नुकताच माझ्या ब्लॉगची पुनर्रचना केली. आधी माझा ब्लॉग म्हणजे सगळी सरमिसळ होती. एका पोस्टचा दुसरीशी संबंध नाही. त्यातून तो इतका मोठा झाला होता की मलाही काही सापडायचे नाही. मग विषयानुरुप त्याचे वेगवेगळे ब्लॉग्स तयार केले. ( उजवी कडे तुम्हाला सगळ्या  ब्लॉग्सच्या लिंकस दिसतील )


पण अजून हा छंद संपत नाहीये. आता एका मैत्रिणीचा ब्लॉग तयार करायचा घाट घातलाय.

आम्ही कोथरूडला आलो त्या आमच्या या सोसायटीमध्ये एक सांस्कृतिक मंच आहे "स्वरगंगा". संगीत, नाट्य, चित्रपट, वैद्यक, शिक्षण असा विविध क्षेत्रातील कलाकारांना, विचारवंतांना यात बोलवले जाते. या मंचात मी ओढली गेले. मग त्या कार्यक्रमांचे आयोजन, नियोजन, निवेदन इत्यादी पार पाडणे असा नवीन छंद लागला. यातून अनेक मुलाखती घेता आल्या. ज्योती सुभाष, डॉ. अनिल अवचट, डॉ. विश्वास मेहेंदळे. नंतर मायबोलीसाठी सौ. लतिका पडळकर तसेच ऐश्वर्या नारकर आणि चँपियन्स चित्रपटातील दोन छोटे कलाकार मच्छिंद्र आणि शंतनु इत्यादींच्या मुलाखती घेता आल्या.

या "स्वरगंगा" मध्ये एक अभिनव कल्पना पुढे आली. अन त्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली. सोसायटीमधील गायकांचा एक कार्यक्रम बसवणे. अन मग लहान मुलांचा " स्वरांजली " अन मोठ्यांचा " सप्तसूर " असे दोन कार्यक्रम तयार झाले. आमच्या सोसायटीतील गौरी शिकारपूर हिने संगीताची जबाबदारी उचलली अन बाकीची सर्व मी. अन दोन अतिशय सुरेख, सुरेल कार्यक्रम तयार झाले. सर्वांनी अतिशय नावाजले. यातून संयोजनाचा छंदही पार पडला.

आमच्या घरी मोठी बहीण सतार वाजवणारी, दुसरी हार्मोनियम वाजवणारी, तिसरी चांगली गाणारी मी मात्र लहानपणापासून दांडगोबा या कॅटेगरीतली. त्यामुळे गायन्-वादनापासून कोसो लांब होते, रादर त्याची एक दडस होती मनात. पण एकदा लेक मावशीकडे गेला असताना पेटीवर छान बोटं फिरवतोय असं लक्षात आलं. अन तिथून त्याच्या वादनाचा, गाण्याचा प्रवास सुरू झाला. शास्त्रीय संगीताच्या गायन आणि हार्मोनियम दोन्हीच्या तीन-तीन परीक्षा त्याने दहावी पर्यंत प्राविण्य मिळवत पूर्ण केल्या. त्याची परीक्षेची तयारी मीच करून घेत असे. पुढे माझ्या मनातली ही गायनाची भीती लेकाला खटकायला लागली. एक तो सोडता इतर कोणाही समोर मी साधं गुणगुणायचीही नाही, आजही तो मेंटल ब्लॉक आहेच. पण त्याने मागे लागून शास्त्रीय गाणं शिकायला लावलं. हा माझा नसलेला, माझ्या लेकाचा छंद. मग सवाई गंधर्व महाविद्यालयात एका वर्षाच्या प्रशस्तीपत्रकाच्या क्लासला जावू लागले. खुप खुप आत मनात पुरलेला हा छंद डोके वर काढू लागला. केवळ गीतांजली पुराणिक मॅडमच्या मार्गदर्शनाने हाही छंद पहिल्या क्रमांकाने पूर्ण केला.


अजून भीती आहेच. पण किमान माझी मी तरी थोडं गायला लागले. या गणपती उत्सवात कसबा, जोगेश्वरी आणि मार्केट यार्ड या गणेश मंडळांमध्ये आणि नवरात्रीला वनदेवी आणि भवानी मातेच्या मंदिरात, मैत्रिण मंजिरी काळे हिच्या कार्यक्रमात निवेदन करता करता तिला गाण्यात साथही देऊ शकले.

अन आता डोक्यात आलाय तो पुष्पौषधींच्या अभ्यासाचा छंद. मागे लेकाच्या अपघातानंतर मला या पुष्पौषधींचा खुप खुप चांगला अनुभव आला. त्या नंतर त्याचा नेटवरून खुप अभ्यास केला, सध्या त्याचा एक क्रॅश कोर्स करतेय. हाही छंद पूर्ण होतोय.

भावी काळासाठी बागकामाचा छंदही लावून घेतला आहे. निसर्गातून मिळणारा आनंद प्रत्यक्षात अनुभवा असाच. एखाद्या झाडाला कोवळी पालवी फुटते, हळूच बेचक्यातून कळी डोकावू लागते, फुललेली फुले सारे घर सुगंधीत करू लागतात,


फांदीला फळ लटकू लागते, त्यावर इवलाली फुलपाखरं नाचू लागतात अन पक्षी बागडू लागतात


तेव्हाचा आनंद व्यक्त करणे मलातरी शक्य नाही. तो "घेण्याचाच" अनुभव !

आज एक आवर्जून सांगावे वाटते, या सर्व छंदांनी माझे आयुष्य खुप समृद्ध केले. हे सगळे छंद मी आजही कमी अधिक प्रमाणात करत असते. या सर्वांनी आनंद तर दिलाच. पण जेव्हा जेव्हा आयुष्यात अडथळे आले, काही अप्रिय घडले, काही अपरिहार्य निर्णय घ्यावे लागले, त्या सर्व प्रसंगात मला "जिवंत" ठेवण्याचे काम या माझ्या छंदांनी केलं. प्रत्येक दु:ख दूर सारताना मला या छंदांचा आधार होता. आयुष्यातला अवघड टप्पे पार पाडताना या छंदांनी मला मित्रमैत्रिणींसारखी साथ दिली. कोणतीही अपेक्षा न ठेवता आधार दिला. आज माझे अनेक मित्रमैत्रिणी मला पन्नाशीची मानत नाहीत, माझ्या या उत्साहाचे सारे श्रेय या सगळ्या छंदांना आहे. त्यांनी मला सजग बनवले, आनंद घ्यायला शिकवले, अडचणीतून हसत वर यायला हात दिला. या छंदांनी मला आनंदाने उडण्यासाठी पिसं दिली.

म्हणुनच म्हणते, " हे छंद जिवाला लावी पिसे !"

( मूळ गाण्याची ओळ वेगळ्या अर्थाने इथे वापरली आहे, त्यातले पहिले अक्षरही बदलले आहे; त्याबद्दल कवयित्री वंदना विटणकर यांची क्षमा मागते. )

11 comments:

  1. अभिनंदन आरती ! खूपच छान जोपासले आहेस सगळेच छंद! :)

    ReplyDelete
  2. भानस, मनापासून धन्यवाद :)

    ReplyDelete
    Replies
    1. Aarati iee. Aapakaa blog dekha. Sunder designs and photos. Marathi padhnaa mere liye mushkil hai but i could make out meanings.

      Delete
  3. धन्यवाद संपदा :)

    ReplyDelete
  4. अभिनंदन आरती....खुपच कौतुक वाटते तुझे...मस्त छंद जोपासलेस तु..अशीच नेहमी प्रगती होवु दे!

    ReplyDelete
  5. धन्यवाद उमा :) अग तुझ्या मिनिएचर कलाकृती मला तू शिकवायच्या आहेस बरं :)

    ReplyDelete
  6. आरती/अवल
    तुमचा ब्लाॅग खुपच आवडला. सिकेपी पाककृतींमध्ये सतत भर घालत रहावी अशी विनंती करते.

    ReplyDelete
  7. मनापासून धन्यवाद, आनंदलहरी __/\__

    ReplyDelete
  8. wow Bhannat aahat Mdm....!! just love u and admire your all hobbies with respect...!!!

    ReplyDelete
  9. धन्यवाद समिधा :)

    ReplyDelete