Tuesday, October 16, 2012

नवरात्र

स्त्री - नेहमी पाहिली जाते ती एक माता म्हणुन, एक सृजनाची शक्ती म्हणून. पण याच स्त्रीचे एक दुसरे रूप साजरा करणारा म्हणजे उ-त्सव " नवरात्री" ! वेळप्रसंगी हाती शस्त्र घेणे, युद्ध, शत्रूचे निर्दालन, राक्षसाचा वध याही गोष्टी स्त्री करू शकते हे मनावर बिंबवणारा हा सण. लेचीपेची, सगळे मान तुकवून स्विकारणारी, पुरुषाचा आधार घेणारी, अबला वेळ आलीच तर कशी सबला होऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे नवरात्र ! स्त्रीची बाकीची रुपं पुजली गेली; तिचे जननी असणे, तिचे अन्नपूर्णा असणे, तिचे लक्ष्मी असणे, तिचे सरस्वती असणे अन अगदी तिचे सती असणेही. पण यापैकी कोणत्याही रुपाचा असा मोठा उ-त्सव झाला नाही. अगदी गौरी पूजन असले तरी ते बांधले गेले गणपतीबरोबर. स्वतंत्रपणे तिचा उ-त्सव येतो तो दुर्गाबनूनच !
या बद्दलच्या तीन कथा मला विचार करायला लावणा-या वाटल्या. कथा तशा नेहमी ऐकलेल्याच. पण त्याचा जरा वेगळा विचार.
पहिली कथा : महिषासूर दैत्याने शिवाची भक्ती केली अन त्याला शिव प्रसन्नही झाला. प्रत्यक्ष शिवाचा आशीर्वाद लाभलेल्या महिषासूराला आता कोणाचीच भीती वाटेना. हळूहळू महिषासूराने लोकांवर अत्याचार करायला सुरुवात केली. परंतु प्रत्यक्ष शिवाचा आशीर्वाद लाभलेल्याने त्याचे दमन करणे अवघड होऊन बसले. शेवटी स्वर्गातले सगळे देव शिवाकडे आले. आणि शिव, विष्णू आणि ब्रह्मा या तिघांनी आपल्या शक्ती एकत्र करून एक स्त्री शक्ती निर्माण केली, तीच ही दुर्गा. स्त्री रुपातली एक अद्वितिय योद्धा, एक स्वरुपसुंदरी. अन मग ही दुर्गा धरतीवर आली. स्वाभाविकच तिच्या सौंदर्याची महिषासूराला भूल पडली. त्याने तिला मागणी घातली. दुर्गेनेही ती मान्य केली; फक्त एकच अट घातली. "मला युद्ध करून जिंकून घे." महिषासूराला हे आवडले. शिवाच्या आशीर्वादाने त्याला आजपर्यंत विजयच मिळत होता. अन हे युद्ध नऊ दिवस चालले. अन शेवटी दहाव्या दिवशी महिषासूराचा दुर्गेने वध केला.ती महिषासूरमर्दिनी झाली.
दुसरी कथा : राम रावणाशी युद्ध करण्यासाठी लंकेच्या सीमेपर्यंत पोहचला. रावणाशी युद्ध करण्यासाठी त्याने पूर्व तयारी म्हणून नऊ दिवस दुर्गेची पुजा, भक्ती केली, अन दहाव्या दिवशी त्याने रावणाशी युद्ध करून त्याचा वध केला.
तिसरी कथा : नवरात्रीमध्ये पहिले तीन दिवस दुर्गेची पुजा केली जाते, चवथा ते सहावा दिवस लक्ष्मीला पुजले जाते अन शेवटचे तीन दिवस सरस्वतीच्या रुपाचे पूजन होते.
या तीन कथांनी एक गोष्ट अधोरेखीत केली असे मला वाटते. की स्त्री ही केवळ सृजन, कोवळेपणा, हळवेपणा, क्षमाशीलता म्हणुनच असावी हे अगदी जुन्या काळातही मान्य नव्हते. वेळ आलीच तर तिने हाती शस्त्रही घ्यावे, दुष्टांचे निर्दालनही करावे, वेळप्रसंगी रक्तपातही करावा, अन गरज भासलीच तर शास्त्र असंमत गोष्टींचा वापर करून सत्यासाठी लढावेही. अन वेळप्रसंगी पुरुषाला मदत- संरक्षण म्हणून खंबीरपणे उभेही रहावे.
अन याही पेक्षा एक खूप महत्वाचा संदेश या कथा देतात. जो सामान्य माणसासाठी खूप महत्वाचा आहे. तिसरी कथा जे सांगते ते मला जरा विचार करायला लावणारे वाटले. आधी दुर्गेची ( शारीरिक शक्तीची ) पूजा, मग लक्ष्मीची ( आर्थिक शक्तीची ) पूजा अन शेवटी सरस्वतीची ( बुद्धीच्या शक्तीची ) पूजा. अन या तिघींची एकत्र पूजा. नक्की काय अभिप्रेत आहे यात? मला भावलेला अर्थ असा की जरी देवांनी निर्माण केलेली, एका विशिष्ठ हेतूने निर्मिलीलेली दुर्गा ही केवळ देवाने निर्मिली म्हणून विजयी होत नाही. तिलाही नऊ दिवस लढावं लागतं, तेही तीन वेगवेगळ्या रुपांत. शारीरिक शक्ती, आर्थिक शक्ती अन बैद्धिक शक्ती या तिन्हींचा वापर करून अन कष्ट करूनच तिलाही विजय प्राप्त झाला. हे नक्की काय सुचवते? मला तर हा वेगळ्या स्वरूपातला कर्मसिद्धांतच वाटतो. कितीही मोठी व्यक्ती असली, कितीही, कुणाचेही वरदहस्त असले तरी शारीरिक शक्ती, आर्थिक शक्ती अन बौद्धिक शक्ती या तीनही आघाड्यांवर प्रयत्न केल्याशिवाय तरणोपाय नाही हे या कथांमधून किती स्वच्छ प्रतीत होतं.
दुसरी कथा मला एक स्त्री म्हणून भावून गेली. राम, एक आदर्शाचा पुतळा. अनेक असूरांना अगदी कुमारावस्थेपासून काबूत आणणा-या रामाला रावणाच्या निर्दालनासाठी दुर्गेची पूजा, भक्ती करावीशी वाटली. रावणासारखा शारीरिक शक्ती, प्रचंड सुबत्ता असणारी लंका आणि रावणाची बुद्धिमत्ता यावर विजय मिळवायचा तर दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती या तिघींच्या पाठिंब्याची गरज त्याला वाटली, त्याने ती मागितली. ह्यातूनही सर्वसामान्य जनतेला वर सांगितलेला संदेश तर मिळतोच. परंतु त्याच बरोबर स्त्री त्रय शक्तींचे महत्वही अधोरेखित होते असे मला वाटते.
जाता जाता एक संदर्भ : काही समाजात नवरात्रीत दुर्गाष्टमीला मद्य, मांस याचा नेवैद्य केला जातो. त्यामागचा विचारही मला वेगळा अन महत्वाचा वाटतो. वेळ आलीच तर दुष्टांना काबूत आणण्यासाठी प्रसंगी त्यांचीच दुष्ट आयुधेही अंगीकारावित असे तर हा नैवद्य सुचवित नसेल? अन ही आयुधे अष्टमीलाच का ? तर या काळात सरस्वतीचे रुप असेल, जिची बुद्धी अतिशय तल्लख आहे. वापरले जाणारे आयुध केवळ या विशिष्ट काळासाठीच आहे याचे भान तिचे जागते असेल अशाच बुद्धीच्या देवतेकडे हे सोपवले आहे.
त्या त्या प्रसंगीच या दुर्गेचा स्विकार करायचा. अन तो तो प्रसंग संपला की आपल्या मूळ वृत्तीकडे यायचे. म्हणूनच तिचे विसर्जनही आवश्यकच.
हे मला सुचलेले अर्थ आहेत. प्रत्येकाला आपल्या मतानुरुप वेगवेगळे अर्थ सापडतीलच. पण या निमित्ताने आपल्या घरातल्या, आसपासच्या, देशातल्या अन जगातल्या अशा स्त्रियांची आठवण काढू, ज्यांनी हे दुर्गेचे रुप धारण केले. अगदी सारे आयुष्य दुर्गेचे असले पाहिजे असे नाही. एखादा प्रसंग ( मग ते अगदी चित्रपतातील असतील, अशा विचारांची गाणी असतील, ... ) ज्यात त्या त्या स्त्रीमध्ये आपल्याला दुर्गा दिसली ते आठवूयात.


1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete