Tuesday, September 4, 2012

चँपियन्स एक सकारात्मक अनुभव !




ऐश्वर्या नारकर, शंतनु रांगणेकर आणि मछिंद्र गडकर यांच्याशी गप्पा झाल्या असल्याने खुप उत्सुकता होती या चित्रपटाबद्दल. त्यातून हे तिघेही इतके घरच्या व्यक्ती सारखे बोलले होते, कोणताही आव न आणता, अगदी मनापासून बोलले होते; की घरच्यांचा चित्रपट पहायचाय अशी काहीशी भावना होती मनात.

चित्रपट गृहात गेलो तर समोरच ऐश्वर्या नारकर उभ्या होत्या. प्रथम मनात आलं ते "वॉव काय मेन्टेन्ड आहेत" असंच. अगदी शीडशीडीत, हसरं, उत्साही आणि खुप सकारात्मक व्यक्तिमस्त्व ! अन चेह-यावर इतका सोज्वळ भाव की पटकन पुढे होऊन सहज बोलावसं वाटलं. ओळख देता क्षणी, "ओ, हो आपण बोललोय फोनवर" ही चटकन प्रतिक्रिया. कोणताही मुलामा नसलेले व्यक्तिमत्व. त्यांच्याशी बोलताना कळले की सकाळी मुंबईत प्रिमियर शो करून तडक पुण्यातल्या शो साठी आले होते सगळे. पण जराही दमलेले, थकलेले नव्हते. उत्साह ओसंडून वाहत होता. आपल्या पहिल्या निर्मितीचा सोहळा, त्या बद्दलचा आनंद, समाधान चेह-यावर फुललं होतं.

आमचे बोलणे चालू असतानाच शेजारी छोटं कोणीतरी उड्या मारत आल्याचं जाणवलं. अन लक्षात आलं हा मछिंद्र. अन त्याच्या मागे शंतनु. मग त्या दोघांशी थोड्या गप्पा मारल्या. अगदी साधी, सरळ, वलयाचा लवलेश नसणारी मुलं.

लांबूनच रमेश मोरे अन अविनाश नारकर दिसले, कोणाशीतरी गंभीर चर्चा चालली होती. अन तेव्हढ्यात चित्रपट सुरू होत होता म्हणून सर्व जण चित्रपट गृहात आम्हीही गेलो.
आम्ही आत जाई पर्यंत पहिली फ्रेम सुरू झाली होती. चिनुक्स, ऋयाम, एन स्वाती यांनी आपल्या मायबोलीचा लोगो झळकलेला पाहिला, मी नेमक्या वेळेस तिकिटावरचा नंबर पाहिला. अन मग हूरहूरले. चिनुक्स रागावलाही, "काय गं " म्हणुन. पण मग "रोज पाहतोच की आपण लोगो दिवसभर " या माझ्या मखलाशीवर गोड हसलाही स्मित

चित्रपट सुरू झाला अन गोष्ट बरीचशी माहिती असूनही चित्रपटाने पकड घेतली. शंतनु अन मछिंद्र या चित्रपटाचे मुख्य कलाकार. दोघांनी अगदी जिंकून घेतलं. मछिंद्रच्या डोळ्यातली चमक आणि शंतनुच्या चेह-यातली समज फार फार भावून गेली. अनेक प्रसंगात त्या दोघांनी आपल्या अभिनयाची फार छान चुणुक दाखवली आहे.
मला सर्वात आवडला; जेव्हा शंतनुला मछिंद्र दिवसभर शोधत राहतो, अन रात्री त्याला त्याचा दादा घरी भेटतो; तो प्रसंग. दोघांनी अफलातून अभिनय केलाय त्या प्रसंगात.

बाकीच्या सगळ्यांनी ती, ती भूमिका अगदी पटेल अशीच केली आहे. प्रत्येकाची व्यक्तिरेखा, "हो ह्या प्रसंगात ही व्यक्ती अशीच वागेल", असंच वाटत राहतं. काही प्रसंगात काही गोष्टी नजरेस येतात, पण त्यांच्याकडे चित्रपटातल्या " टायपो " म्हणून दुर्लक्ष नक्की करता येतं. मूळ मांडणीला फार धक्का नाही लावत त्या.

दिग्दर्शक म्हणू रमेश मोरे यांचं आणि त्यांना हवी ती स्पेस दिल्याबद्दल निर्मात्यांचेही कौतुक. ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या मुलाखतीत म्हटल्या प्रमाणे, रमेश मोरे यांनी खरोखर दोन्ही मुलांकडून "अभिनय करताहेत हे जाणवून न देता अभिनय" करवून घेतला आहे. एव्हढा गंभीर विषय मुलांकडून करवून घेणं हे नक्कीच अवघड आणि जबाबदारीचे काम. अन मोरे यांनी फार छान निभावलं आहे ते. अशा गंभीर विषयावर काम करून घेताना कुठेही त्या मुलांचे मूलपण हरवणार नाही याची काळजी त्यांनी चित्रपटात अन वास्तवातही दाखवली आहे.
चित्रपटातील विषयाचे गांभीर्य आपल्याला जाणवते, अन ते अंगावर येतही नाही. अशा स्वरूपच्या विषयांमध्ये ही एक खुप मोठी भीती असते की, ते विषय आपल्या अंगावर येऊ शकतात, पण तसं न होऊ देण्याची काळजी रमेश मोरें नी घेतली आहे. इतक्या लहान वयात एव्हढी जाण खरच कौतुकाचीच आहे. त्या समोर काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या निश्चित कानाआड करता येतील. भावी काळात त्यांच्याकडून अधिकाधिक चांगल्या चित्रपटांची आपण नक्कीच अपेक्षा करू शकतो. त्यांना खुप खुप शुभेच्छा!

निर्माते म्हणून नारकर पतीपत्नींचेही खुप कौतुक. स्वतःचा चित्रपट असूनही आपल्या भूमिकांची, गरज आहे तेव्हढी अन तेव्हढीच लांबी अन खोली ठेवणे मोठमोठ्या लोकांनाही जड जातं. पण सामाजिक जाणीवांमुळे ऐश्वर्या आणि अविनाश यांनी ते भान टिकवलं आहे. अगदी सहज शक्य असून अन जास्ती गर्दी खेचता येईल असा "ग्लोरिफाय" शेवट न करता सर्वात जास्त शक्य असा अतिशय व्यवहाराला धरून अन तरीही अतिशय सकारात्मक शेवट त्यांनी आणि मोरे यांनी ठेवला आहे. अनेकांना या शेवटामुळे चित्रपट अपूर्णही वाटेल. पण माझ्या मते असा शेवट करता येणं हे जास्त अवघड काम. कारण त्यात गोष्ट चालू राहते प्रेक्षकांच्या मनात. एक ठोक शेवट देण्यापेक्षा वास्तव देणं हे जास्त संयुक्तिक वाटलं नारकर आणि मोरे यांच्या वैचारिक पार्श्वभूमीवर.

ऊगाच कौतुक म्हणुन नव्हे पण खरोखर अतिशय वास्तव, सकारात्मक आणि तरीही अंगावर न येणारे आणि काही एक शक्य उत्तर देणारा चित्रपट ! मराठीत असा चित्रपट निघाला, ही खुप आनंद देणारी गोष्ट.

एक आवर्जून पहावा असा चित्रपट.

***

No comments:

Post a Comment