Wednesday, August 24, 2011

'बिंदूसरोवर' : ले. राजेन्द्र खेर


' बिंदूसरोवर' - ले. राजेन्द्र खेर
विहंग प्रकाशन : डिसेंबर २००८
मूल्य १६०/- रु. पृष्ठसंख्या - २०८


मुखपृष्ठ बघून मी एकदम थांबलेच दुकानात. खजिन्याची पेटी, अक्राळ-विक्राळ राक्षसांचे चेहरे, हवेत उडणारी भूतं, गूढरम्य वातावरण, ढगात चमकणारी वीज, एक तेज:पुंज चेहरा; सगळं सगळं मला माझ्या बालपणात घेऊन गेलं. आणि आपसुक हात पुढे झाले 'बिंदूसरोवरा'ला घ्यायला !

'बिंदूसरोवरावर जाण्यापूर्वी' मध्ये लेखकानेच म्हटल्याप्रमाणेच, "अलिकडच्या काळात अद्-भूतरम्य कादंबर्‍या फारशा लिहिल्या जात नाहीत. " खरे तर प्रत्येकाच्या मनात एक बालमन दडलेलं असतं. खजिना, जादू, चेटकीण, अबलख घोडा, चमत्कार हे सगळे प्रत्येकाला एका वेगळ्या जगात घेऊन जातात.
अगदी आजही सुपरमॅन, नार्निया पासून हॅरी पॉटर, लॉर्ड ऑफ द रिंग या सर्वांना मिळणारा प्रतिसाद हेच व्यक्त करतो ना ?

मराठीत लहान मुलांच्या अनेक गोष्टींमध्ये ही अद्-भूतरम्य दुनिया दिसते. परंतु मोठ्यांना चकीत करून सोडेल, त्यांचं मन गुंतवून ठेऊ शकेल अशा अद्-भूत गोष्टी अभावानेच अढळतात. मला वाटतं मोठ्यांना अशा अद्-भूत गोष्टीत गुंगवून टाकणं हे अनेक अर्थाने अवघड असतं. एकतर मूळ कथाबीज हे तेव्हढ्या ताकदीचे असावे लागते. शिवाय कथा फुलवतानाही हे अद्-भूतरम्यतेचे वातावरण टिकवायचे, फुलवायचे कामही अवघड असते. सामान्यतः लहान मुलं चमत्कारिक, जादूमय जगतात तर्क काढू पहात नाही; त्या जादूमय वातावरणाशी ती चटकन अन सहज एकरुप होतात. जसजसे वय वाढत जाते, तसतशी आपली तार्कीक बुद्धी आपल्याला असे एकरुप व्हायला अडकाठी करू लागते. आणि म्हणूनच मोठ्यांसाठी अद्-भूतरम्य लेखन हे जास्त आव्हानात्मक ठरते.

त्यातून मराठी माणूस साहित्याबाबत जास्ती तर्ककर्कश्य आहे. एरवी 'हे ठिक आहे' असं म्हणून तो सोडून देईल पण काळ्या-पांढर्‍यात येणारी गोष्ट तो तावून सुलाखून घेईल. हे मी जितकं मजेने लिहितेय, तेव्हढच गंभीरपणे आणि विचारपूर्वकही म्हणतेय. कारण मराठी साहित्याच्या वाचकाइतका सजग, सतर्क, प्रगल्भ आणि जाणीवपूर्वक वाचणारा वाचक विरळाच.

पाश्चात्य अद्-भूतरम्य कथा आणि भारतीय अद्-भूतरम्य कथा यांच्यातला भेद लक्षात घेऊन आपली कादंबरी यापेक्षा वेगळी कशी आहे हे सांगताना लेखक म्हणतात, " वास्तवाकडून अद्-भूततेकडे जाणारी आणि अद्-भूतातले वास्तव दर्शवणारी अशी ही कादंबरी वाचकाला एका अनोख्या प्रांताचा प्रवास घडवेल." खरच, मराठीमध्ये एक खुप ताकदीची अद्-भूतरम्य कादंबरी "बिंदूसरोवर"च्या निमित्ताने आली आहे असे मला वाटते.

कथाबीज :
कोणा एका प्रा. विश्वनाथननी आपल्या शिष्यावर एक कामगिरी सोपवली आहे; एका रहस्यमय पंचधातूच्या पेटीचे 'बिंदूसरोवरा'मध्ये विसर्जन करण्याची. त्यासाठी विक्रमने अन त्याच्या सोबत इतर काहींनी केलेल्या प्रवासाची ही कथा.

कथाविस्तार :
या प्रवासाची गोष्ट सांगताना राजेन्द्र खेर यांनी अनेक व्यक्ती, अनेक घटना, अनेक स्थळं, अनेक समाज, निसर्गाची अनेक रुपं, विविध वैचारिक विश्लेषणे, अध्यात्मिक विवेचने या अनेक गोष्टींची निर्मिती केलीय. या सर्वांतून प्रवास करताना अनेकदा आपण मूळ कथाबिजाला विसरून त्या त्या क्षणी घडणार्‍या कथेत रंगून जातो न जातो तोच या मूळ बिजाशी लेखक आपल्याला खेचून आणतो. आणि हा परत परत येणारा अनुभव आपल्याला या अद्-भूततेच्या प्रवासाशी अधिकाधिक जखडत जातो.
उदाहरणार्थ,

संपूर्ण विश्वाचा आणि त्या पंचधातूच्या पेटीचा असलेला संबंध !
"द टॄथ बिहाइंड द प्रिन्सिपल्स ऑफ फिलॉसॉफी अँड स्पिरिच्युअ‍ॅलिटी " चे चर्चासत्र आणि त्यातील प्रा. विश्वनाथन यांनी मांडलेले विचार !
विक्रमचा सुरू झालेला प्रवास !
महायोगी महानंद, कीथ अंडरवूड, ऑस्कर डिसूझा, डोंगराळ प्रदेशातला शंकर अन त्याचे कुटुंबीय, त्रिदंडी महाराज अन त्यांचा आश्रम अन त्यांचे अनुयायी, अमृतानंदमयी उर्फ अपूर्वा, इबा राजा अन त्याचे राज्य अन त्याची प्रजा - विक्रमला त्याच्या प्रवासात भेटलेले हे सगळे सहप्रवासी अन त्यांची अद्-भूतरम्य जीवन !
महायोगी महानंदांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्यांचे विचार, त्यांचे मार्गदर्शन अन त्यांनी केलेले विश्लेषण !
विक्रम अन अपूर्वा यांच्यात बदलत जाणारे अन विकसीत जाणारे नाते !
कीथचे अतिशय सकारात्मक व्यक्तित्व अन त्याची अत्यंत शांत पण मनःपूर्वक वाटचाल !
त्रिदंडी महाराजांचे गूढ, त्यांचे चातुर्य, त्यांच्या आश्रमातले रहस्यमय वातावरण अन... !
त्या पंचधातूच्या पेटीचे रहस्य, बिंदूसरोवराचा शोध अन त्याचे मूळ रूप !
बिंदूसरोवराच्या मार्गातली नऊ द्वारं !
आणि या सर्वांवर कडी करेल अशी ' विश्वाचे गूढ आणि अध्यात्माशी त्याची जोडलेली सांगड ' !
ही सांगड खरोखर अफलातून आणि प्रत्येकाने स्वतः अनुभवावी, विचार करावी अशी !

कथासार :
प्रत्येक अद्-भूतरम्य कथेचे सार वाचकाच्या मनात अद्-भूतता निर्माण करावयाची, अद्-भूत रसाचा अनुभव वाचकाला द्यायचा हे असते. ते तर ही कादंबरी क्षणाक्षणाला पूर्ण करते. पण त्याही पुढे जाऊन एकूणातच मूल्यरचना, त्यातही आजच्या धावपळीच्या तांत्रिक प्रगतीने भारावून गेलेल्या जगाच्या, पैसा-प्रतिष्ठा-अधिकार यांनी भरलेल्या जगाच्या पार्श्वभूमीवर वैचारीक-अध्यात्मिक-नैतिक मूल्यांचे महत्व मनावर ठसवण्याचा प्रयत्न राजेन्द्र खेर करतात.

उदा. कलीयुगातही फुलं फुललेल्या बाभळीच्या झाडाची गोष्ट येते. त्यात "... कारण मी अजून सत्ययुगात आहे! मी माझा वेग मंद केला आहे. कलियुगात जायची घाई कशाला करायची? ज्यांना वेगाने पुढे जायचे आहे त्यांना जाऊ द्या! ते काट्यांना प्राप्त होतील. पण सत्ययुगात असल्यामुळे मी मात्र सुखात आहे." असे आजच्या "वेगाचे वेड" असणार्‍यांवर मार्मिक टिप्पणी करणे असेल किंवा,

शहरीकरण आणि धावपळीला "...शहरातल्या लोकांना दैनंदिन जीवनात सतत चिंता असतात. विविध प्रसारमाध्यमं चिंतांविषयी जागृती म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं तर ' अवेअरनेस ऑफ वरीज' त्यांच्या माथी मारत असतात. शहरात खुप धावपळ असते. पण त्या धावपळीत प्राण नसतो. माणूस सतत काहीतरी मिळवण्यासाठी दिवस-रात्र पळत असतो. माणूस जो पर्यंत पैशाला फिरवत असतो तोपर्यंत ठीक चालतं. पण जेव्हा पैसा माणसाला फिरवू लागतो तेव्हा दु:खाची मालिका सुरू होते." असे सडेतोड उत्तर असेल किंवा,

बिंदूसरोवरापर्यंत जाण्याच्या मार्गातल्या नऊ द्वारांचे विवेचन असेल, किंवा
सर्वात शेवटी सापडणारा, विश्वावर ताबा मिळवण्याचा सांकेतिक मंत्र असेल !
या सर्वांतून आदर्शवादी, स्वप्नवादी, काहींना थोडा बालीश वाटेल पण अतिशय सकारात्मकता देण्याचा लेखकाचा प्रयत्न माझ्यासारख्या आशावादी, काहीशा भावूक वाचकाला भावून गेला हे नक्की !

या कादंबरीने मला काय दिलं ? याचा विचार करताना मला जाणवलं, की एक अद्-भूत रम्य कादंबरी असल्यामुळे काही काळ मला अद्-भूतरसाचा आस्वाद तर मला मिळालाच पण त्याही पुढे जाऊन अनेक गोष्टी मला मिळाल्या.

संपूर्ण कादंबरी मी एका दमात तर वाचून काढलीच. अन त्या संपूर्ण काळात मी माझ्या आजूबाजूचे सगळे विसरले. माझ्या चिंता, काळज्या, अगदी जबाबदार्‍याही मी विसरू शकले. एका संपूर्ण वेगळ्या अन तरीही माझ्या वाटू शकणार्‍या जगात मी वावरत होते. या नव्या जगात माझ्यासारखीच माणसं होती, माझ्या जगातल्याच चिंता होत्या, जबाबदार्‍या होत्या, एक अनामिक हुरहुर होती, एक उत्कंठावर्धक रहस्य होतं,... काय नव्हतं ?

प्रामुख्याने इबा राजाच्या राज्यापासूनचा प्रवास मला फार फार काही देऊन गेला. माझ्यासारख्या नास्तिकाला अध्यात्माचं वावडंच असतं. पण मलाही या प्रवासातल्या अध्यात्म्याने भारून टाकलं. निसर्गाची ताकद, त्याचे महत्व, त्याची अपरिहार्यता मनावर बिंबली. जीवनाच्या धावेवर जरा थांबून विचार करावा वाटला. लेखकाने म्हटल्याप्रमाणे "... भौतिक वस्तूंचा त्याग करताना एकप्रकारचा अनामिक आनंद निश्चितच मिळतो." हे अनुभवावेसे वाटले. अपूर्वाला जे "अनामिक सुख" शहरातल्या सोई-समृद्धीत सापडले नाही, आश्रमातल्या साधनेत सापडले नाही ते अनामिक सुख तिला या प्रवासात सापडले. ते सुख मलाही हवेहवेसे वाटू लागले. ब्रह्मद्वाराच्या अलिकडे भेटलेल्या,दैवी सामर्थ्य प्राप्त केलेल्या योगी पुरुषाने सांगितल्याप्रमाणे " माहितीपेक्षा अनुभव अधिक महत्वाचा !" हे मला पटले अन त्या 'अनुभवाची' आस मला लागली. शेवटच्या प्रसंगातला वैश्विक खेळ मला प्रत्यक्ष पहावासा वाटू लागला. निसर्ग, विज्ञान, देवत्व, अध्यात्म यांचा तो अनाकलनीय परंतु मनोवेधक कल्पनाविलास मला प्रत्यक्ष अनुभवावा वाटू लागला.

मला वाटतं इतके तादात्म्य निर्माण करणं हेच तर कादंबरीचे सर्वात महत्वाचे साध्य ! नाही का ?

No comments:

Post a Comment