Friday, August 5, 2011

पृथ्वीचे लग्न
जेष्ठातली उतरती सांज
उडू लागली धूळ त्यात
पसरली जणू आसमंतात
तव लग्नाची खबर-बात
मग केली गर्दी मेघांनी
गेले सारे आभाळ भरुनी
आच्छादन पडे, होई सावली
छे, हा तर मंडप दारी


वारा सुटला, सुटली पाने
पखरण पिवळ्या पानांची
धरती झाली पिवळी पिवळी
हळद लागली नवरीची
घुमु लागली वार्‍याची सनई
तडतड ताशा वीज वाजवी
गडगडाट घुमला नभांगणी
छे, ही तर लग्नाची वाजंत्री

थेंब टपोरे पडू लागले
मोत्यांच्या लडीवर लडी
पोचू लागल्या गावोगावी
तव लग्नाच्या अक्षत-राशी


मातीच्या ढेपेतूनी वर
येऊ पाहे हिरवे रोप
दोन्ही पाने देती आशिष
पुजते गौरीहर तु त्यासउमलूनी येई, ही पहाट
साकळलेले धुके दाट
विप्र उभे धरूनी ताठ
दोघांमधला अंतरपाट

पूर्व दिशेला नभी अवतरे
सप्तरंगी इंद्रधनु ते
जणू सुगंधी सुमनांची
शोभे मुंडावळी कपाळी


हिरवी हिरवी हिरवळ त्यावर
रंगबिरंगी सुमने नाजूक
धरती ल्याली नवे रूप
छे, हा तर शालू हिरवा तवगाऊ लागले मधूर स्वरात
सारे खग-गण एक सूरात
एका मागूनी एक गाई
मंगलाष्टके सुरू झालीझर्-झर झर्-झर झरू लागले
डोंगरातुनी खळ्ळाळ झरे
निशीगंधाच्या शुभ्र तुर्‍यांचे
शोभती हार वधू-वरांचे

उभे मध्ये मेघांचे तोरण
हळूच बघे वर रवी एक क्षण
झाले सारे केशरी भू-वन
संपन्न होई पाणिग्रहण !

4 comments:

 1. kiti sundar Arati tujhi pratibha bharala aliy
  Ba Bh Orakarancha Samudra bilori aina Pruthavila satava mahina athaval

  ReplyDelete
 2. धन्यवाद, शोभना. अगं किती चढवशील ? पडेन ना मी :)
  अगं कवितेच्या या ओळी सुचत गेल्या अन मग तशी चित्र शोधत अन काढत गेले.
  आता "तिचा संसार" घोळतोय डोक्यात. बघू काही सुचलं तर .
  तुझ्यासारख्या कौतुक करणार्‍या मैत्रिणी असल्यावर उभारी येते बघ लिहायला :)

  ReplyDelete
 3. खूप छान आहे लग्न सोहळा. आवडला.

  ReplyDelete
 4. धन्यवाद, मीनल :)

  ReplyDelete