Sunday, August 8, 2010

पार्किन्सन्स मित्रमंडळ मेळावा

पार्किन्सन हा मेंदूतील एका भागातील पेशींची संख्या आणि कार्य कमी झाल्याने होणारा आजार.
आज त्या आजाराबद्दल तशी फारशी माहिती सर्वांना असतेच असे नाही. मलाही याबद्दल फारच त्रोटक माहिती होती. माझी मैत्रीण सौ. शोभना तीर्थळी ही पार्किन्सन सपोर्ट गृपचे काम करते. तिने या गृपच्या ११ एप्रिल या पार्किन्सन दिनानिमित्तच्या मेळाव्याला मला बोलावले होते. त्या मेळव्याचा हा वृत्तांत !
मेंदूतील सबस्टॅन्शिया नायग्रा या पेशींचे प्रमुख कार्य डोपामिन नावाचा रासायनिक रेणू तयार करणे हे होय. आपल्या हालचालीतील सुबकता, डौल आणि सफाई या रेणूंमुळे आपल्याला प्राप्त होतो.
या आजाराची अनेकविध लक्षणे आहेत.
१. हाता- पायाला कंप सुटणे ( हा कंप हातात एखादी वस्तू धरली तर कमी होतो आणि हात मोकळे सोडले की हा कंप वाढतो हे वेगळेपण )
२. कडकपणा येणे. त्यामुळे हात, पाय किंवा पूर्ण शरीर कडक होऊ शकते.
३. हालचाली मंद होणे. कोणतेही काम करायला यामुळे वेळ लागतो. आवाज, लेखन बारीक होऊ लागते.
४. मानसिक नैराश्य आणि अस्वस्थता. आजूबाजूच्या वातावरणात समरस व्हायला या व्यक्ती अनुत्सुक असतात.
५. चेहर्‍यावरचे हावभाव कमी होणे, तोंडातून लाळ गळणे, चालण्याच्या वेगावर नियंत्रण न राहणे, बद्धकोष्ठता होणे, वास कमी येणे.
क्लिनिकली हा आजार निश्चित करता येत नाही. म्हणजे या डोपामिनची मोजणी करता येत नाही. त्यामुळे लक्षणांवरूनच या आजाराची निश्चिती करावी लागते. बर्‍याचदा या आजाराची निश्चिती न झाल्याने त्या व्यक्तीला अन नातेवाईकांना त्या व्यक्तीतील होणारे बदल कळतच नाहीत. तशात या आजारात वेळोवेळी येणार्‍या मानसिक नैराश्या मुळे त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. याचा परिणाम स्वाभाविकच संपूर्ण कुटुंबावर होतो. बाहेर जाताना घाबरणे, अगदी ओळखीच्या लोकांमध्येही न मिसळणे, एकलकोंडेपणा अशा बदलांमुळे या व्यक्ती समाजापासून दूर जाऊ लागतात. अन हळूहळू त्यांचे जगणे कॉटशी बांधले जाऊ लागते. हे टाळून त्यांना पुन्हा "जगण्या"शी बाधून घेण्याचे काम हा सपोर्ट गृप करतो आहे.
श्री. शरच्चंद्र पटचर्धन, श्री. मधुसुदन शेंडे, सौ. श्यामला शेंडे, श्री. गोपाळ तीर्थळी, सौ.(डॉ.) शोभना तीर्थळी, श्री.अनिल कुलकर्णी, श्री. राजीव ढमढेरे, सौ. अंजली महाजन, श्री. चंद्रकांत दिवाणे, सौ. प्रज्ञा जोशी, श्री. शेखर बर्वे, श्री. रामचंद्र करमरकर आणि सौ. विजयालक्ष्मी रेवणकर यांच्या कार्यातून हा पार्किन्सन सपोर्ट गृप अतिशय मोठे, महत्वाचे , गरजेचे आणि छान काम करतो आहे.
या मेळाव्यात श्री. अनिल अवचट अध्यक्ष म्हणून आले होते. चित्रकला, गायन, ओरिगामी अशा अनेक माध्यमांतून त्यांनी या सर्वांना आनंद मिळवण्याच्या छोट्या छोट्या गोष्टी सांगीतल्या. अनेक शुभार्थी ( रुग्ण) आणि शुभंकर ( रुग्णाचे सहाय्यक ) यांनी ही आपले अनुभव आणि कला सादर केल्या.
शुभार्थींच्या कलाकृतींचे ( चित्रकला, हस्तकला, विणकाम, फोटोग्राफी इ. ) प्रदर्शनही तेथे मांडले होते.
या कार्यक्रमाने मला पुढील १० वर्षांसाठीचा उत्साह दिला. ज्यांच्या चेहर्‍यावर आजाराने आक्रमण करून हातपायचेहरा ताठर करून ठेवला आहे; त्यावरही अथक प्रयत्न करून ही मंडळी आपले हास्य टिकवून आहेत हे या फोटोंवरून तुम्हाला कळेल. यात काही शुभार्थी आहेत तर काही शुभंकर आहेत. त्यांचे हास्य, टाळ्या वाजवणारे हात, आश्चर्य व्यक्त करणारी बोटे,.... सगळेच मला खुप काही शिकवून गेले....!
औषधे, व्यायाम, प्राणायाम, हास्ययोग, चित्रकला, इतर कला, अगदी नाच शिकणेही अशा अनेक आणि अथक प्रयत्नांनी या सर्वांनी आपले " जगणे" नव्हे " आनंददायी जगणे" चालू ठेवले आहे.
या माध्यमातून माझे या सर्वांना लवून हजार-हजार सलाम ! आणि खुप खुप शुभेच्छा !
१. आश्चर्य व्यक्त करणारी 'कडक'बोटे
Parkinson 2. थरथरणारी बोटे ,धाप लागणारी छाती आणि आनंदाने जगण्याची सुरेल जिद्द
३.चेहर्‍याचे स्नायू साथ न का देईना; माझे डोळेच व्यक्त करतील माझी जगण्याची उमेद
4
४. व्हिलचेअरची साथ अन मनाची उभारी; त्यातूनच तर आली आहे ही एकाग्रता
5
५. उल्हसित करणारे हे हास्य
6
६."अरे वा ! हे तर फारच गमतीचे आहे की " साथ न देणार्‍या हातांची उस्फूर्त दाद
Parkinson 5. "अरे वा ! हे तर फारच गमतीचे आहे की " साथ न देणार्‍या हातांची उस्फूर्त दाद
७.हातातली काठी, कडक झालेले स्नायू, डोळ्यांचा अधूपणा, अन जोडीने अवचटसरांच्या कलाकृती पाहण्याची, शिकून घेण्याची दुर्दम्य इच्छा !
10
11
12
८. अन शुभार्थींच्या या काही कलाकृती.
kala
( माहितीसाठी आभार -" जागतिक पार्किन्सन्स दिवस- ११ एप्रिल २०१० - स्मरणिका , पार्किन्सन्स मित्रमंडळ , पुणे ")
---------------------------------------------------------------------------------------------


No comments:

Post a Comment